अखेरच्या टप्प्यातही पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचार; भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूलकडून हल्ले

मतदारांना रोखून धमकावण्याचे प्रकार

डायमंड हार्बर (पश्‍चिम बंगाल) – लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यामध्ये आज झालेल्या मतदानादरम्यान पश्‍चिम बंगालमधील वेगवेगळ्या भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनांची नोंद झाली. तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी या हिंसाचाराबाबत एकमेकाला दोष दिला आहे.

या हिंसाचारादरम्यान काही राजकीय नेत्यांच्या वाहनांची तोडफोड झाली. आपल्या काही पदाधिकाऱ्यांना तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोपही भाजपने केला आहे. भाजपच्या मंडळ अध्यक्षाला तृणमूलच्या गुंडांकडून मारहाण झाल्याचा आरोप जदवपूर येथील भाजपचे उमेदवार अनुपम हाझिया यांनी केला आहे. तृणमूलच्या गुंडांनी भाजप मंडळ अध्यक्ष्याच्या कारचीही मोडतोड केली आणि चालकालाही मारहाण केली, असे हाझिया म्हणाले.

बसिरहात येथील मतदान केंद्राबाहेर तृणमूलच्या गुंडांनी मतदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. याविरोधात पोलिसांकडे तक्रार करायला गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना तृणमूलच्या गुंडांनी वाटेतच गाठून मारहाण केली, असे काही जणांनी सांगितले. किमान 10 मतदारांना तृणमूलच्या गुंडांनी रोखले. त्यांना मतदानासाठी नेणार आहोत, असे यावेळी उपस्थित असलेले भाजपचे बसिरहात येथील भाजपचे उमेदवार सयानतन बासू यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेमध्ये तृणमूलने हस्तक्षेप केला असल्याचा आरोपही बासू यांनी केला.

जदवपूरमध्येही काही मतदान केंद्रांबाहेर असाच प्रकार घडला. तृणमूलच्या विरोधात भाजपसह भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही अशीच तक्रार केली आहे. भाकपचे उमेदवार पल्लब सेनगुप्ता यांनी तृणमूलच्या विरोधात 142 तक्रारी नोंदवल्या. तृणमूलचे कार्यकर्ते मतदारांना धमकावत असल्याचा आरोपही सेनगुप्ता यांनी केला.

पश्‍चिम बंगालमधील उत्तर कोलकाता मतदार संघामध्ये गिरीश पार्कजवळ क्रूड बॉम्ब फेकण्यात आला. मात्र या भागात झालेला मोठा आवाज क्रूड बॉम्बचा नसून फटाक्‍यांचा होता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. कोलकाता परिसरामध्ये तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक बाचाबाचीच्या काही घटना घडल्या. काही ठिकाणी “ईव्हीएम’बाबतच्या तक्रारीही आल्या. तांत्रिक कारणामुळे मतदानात खोळंबा झाल्यामुळे राखीव “ईव्हीएम’ तातडीने उपलब्ध करून देण्यात आली.

पंजाबमध्ये हिंसक घटना
पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्येही काही ठिकाणी हिंसाचाराच्य घटना घडल्या. उत्तर प्रदेशातील चांदौली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये माराम्री झाली. तारा जीवनपूर गावामध्ये दलित मतदाराच्या बोटांना मतदान करण्यापूर्वी शाई लावण्यावरून बाचाबाची झाली होती. पंजाबमध्ये कॉंग्रेस आणि अकाली-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये भटिंडा आणि गुरुदासपूर येथील तालवंडी साबो येथे संघर्ष झाला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून गोळीबार झाल्याचा आरोप अकाली कार्यकर्त्यांकडून केला गेला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)