पुणे – हिमांशू अगरवाल आणि सौम्या मोहंतीच्या अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर सिमन्स संघाने पीटीसी संघावर 163 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सिमन्स संघाने दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पीटीसीचा डाव 66 धावांत गुंडाळला.
सिमन्सने व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा ही कटारिया हायस्कूलच्या मैदानावर होत आहे. सिमन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 229 धावा केल्या. यात हिमांशू अगरवालने 41 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 77 धावांची आक्रमक खेळी केली. यानंतर सौम्या मोहंतीने 28 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 54, तर सौरभ देवरेने 16 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 43 धावांची खेळी करत संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना पीटीसी संघातील एकाही फलंदाजाचा सिमन्सच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. पीटीसीचा डाव 15.1 षटकांत 66 धावांत आटोपला.
दुसऱ्या लढतीत डिसॉल्ट सिस्टिम संघाने यार्डी सॉफ्टवेअर संघावर सहा गडी राखून मात केली. यार्डी संघाचा डाव 91 धावांत आटोपला. डिसॉल्ट सिस्टिम संघाने विजयी लक्ष्य 17.1 षटकांत 4 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.