विखे – थोरात यांच्यातच आता जुंपली

निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसअंतर्गत वाद चव्हाट्यावर


उमेदवारीसाठी विखेंकडून दबाव तंत्र सुरूच

– जयंत कुलकर्णी

नगर – गेल्या दोन-अडीच वर्षांपासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव व पद्‌मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांना कॉंग्रेस आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता दुरापास्त झाली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात नव्याने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. राष्ट्रवादीने महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांची उमेदवारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी निश्‍चित केल्यानंतर विखेंचा तीळपापड झाला असून, त्यावरून ना. विखे व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात आता चांगलीच जुंपली आहे. नागवडे यांच्या उमेदवारी मागे आ. थोरात असल्याच्या कारणावरून विखे पिता-पुत्रांनी थेट संगमनेरमध्ये जाऊन आ. थोरातांना लक्ष्य केले. त्याला आ. थोरातांनी उत्तर दिल्याने जिल्ह्यात दोन माजी मंत्र्यांमध्ये संघर्ष सुरू झाला असून, कॉंग्रेसअंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात विखे-थोरात यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे. या वादामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसची वाताहत झाली असतानाही या दोन्ही उभयतांमधील वाद काही संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. प्रदेशपातळीवर हा वाद संपविण्याचा वारंवार प्रयत्न झाला. सूचना नाही तर थेट आदेश देखील देण्यात आले. परंतु हा संघर्ष धुमसतच राहिला आहे. आजच्या सर्व निवडणुका असो की पक्षांतर्गत नियुक्‍त्या दोन्ही नेत्यांकडून जिरवाजिरवीचे राजकारण करण्यात झाले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना हा वाद डोकेदुखीच ठरला असला, तरी दोन्ही नेते राज्यपातळीवरचे असल्याने त्यांनी या वादापुढे हात टेकले आहेत. आताही निमित्त लोकसभेच्या उमेदवारीचे आहे. डॉ. सुजय विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. परंतु हा मतदारसंघ कॉंग्रेस आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्यात यावा, यासाठी कॉंग्रेसच्या बहुतांशी वरिष्ठ नेत्यांसह विखेंनी जोरदार प्रयत्न केले. परंतु राष्ट्रवादी हा मतदारसंघ न सोडण्यावर ठाम आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील राष्ट्रवादीच ही जागा लढविणार असून, कॉंग्रेसला तो सोडण्याचा प्रश्‍न येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे डॉ. विखे यांनीही बेताल वक्‍तव्य सुरू केले. मतदारसंघात संपर्क मोहिमेमध्ये भाजपमध्ये जाणार, तर कधी अपक्ष निवडणूक लढणार, तर कधी पक्ष म्हणजे टोळ्या असे वक्‍तव्य केले.

विखे व पवार यांच्यातील वाद हा तसा जुनाच आहे. पद्‌मभूषण कै. बाळासाहेब विखे व पवार यांच्यातील वादाचा फटका आज त्यांच्या नातवाला बसत आहे. विखे नको म्हणून राष्ट्रवादीने अनेकांची चाचपणी केली. पक्षातूनच माजी आमदार नरेंद्र घुले, दादा कळमकर, अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. त्यानंतर माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, विखे शैक्षणिक संकुलाचे संचालक अशोक विखे यांच्या नावाची देखील चाचपणी करण्यात आली. परंतु निवडून येण्याची क्षमता असणे आवश्‍यक आहे. डॉ. विखे यांनी कॉंग्रेसला जागा सोडणार नसाल, तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याबाबत देखील मत व्यक्‍त केले. पण विखे नकोच हे राष्ट्रवादीने पक्‍के ठरविले होते. उमेदवारीसाठी ना. विखे यांनी अनेकवेळा शरद पवार यांची भेट घेतली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. अखेर श्रीगोंद्यातील नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आहे. अर्थात नागवडे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु निवडून येण्याची समीकरणे नागवडे यांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी उमेदवारीची तयारी दर्शविली आहे. सध्या तरी नागवडे याच राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्यावर शिक्‍कामोर्तब झाला आहे. येत्या 2 मार्चला शरद पवार यांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात होणाऱ्या मेळाव्यात नागवडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे.

नागवडे यांचे नाव निश्‍चित झाल्याने विखे नाराज झाले असून, या मागे आ. थोरात असल्याचे कारण पुढे करून आता विखे पिता-पुत्रांनी आ. थोरात लक्ष्य केले. संगमनेर तालुक्‍यातील निमोण गावात डॉ. विखे यांनी आ. थोरात यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. आजवर आम्ही सहन केले. आता आम्हाला सहन करा, निळवंडेसाठी किती निधी आणला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासह अनेक आरोप केले. त्यांचे चित्रीकरण संगमनेर तालुक्‍यात व्हायरल झाले. त्यानंतर ना. विखे यांनी वाळू तस्करीचा आरोप करून त्यांचा आता बंदोबस्त करावा लागणार असल्याचा इशारा देखील दिला. त्यानंतर दोन दिवसांनी आ. थोरात यांनी संयमाने नावे टाळून विखेंवर टीका केली. बालक खुनशीने बोलत असतांना आईसाहेब सुद्धा टाळ्या वाजवीत होत्या, ज्यांना आम्हीच दोनदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. केवळ पक्षाने सांगितले म्हणून. आता त्यांनीच टाळ्या वाजव्याव्यात का, असा टोला आ. थोरात यांनी लगावला आहे. सध्या तरी जिल्ह्यात विखे-थोरात यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपवर चांगलीच चर्चा जडत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये चांगले जुंपले आहे.

राष्ट्रवादी उमेदवारी देईना, अन्‌ कॉंग्रेस लक्ष घालेना त्यामुळे आता विखे यांनी दबाव तंत्राचा वापर सुरू करून भाजप प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. येत्या 1 मार्चला कार्यकर्त्यांकडून नगर दक्षिणेचा अहवाल आल्यानंतर ते त्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. राज्याचे विरोधी पक्ष आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून राधाकृष्ण विखे यांचा राज्यात दबदबा आहे. परंतु आज पुत्राला लोकसभेची उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी भाजपचे दार ठोठावले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हा कॉंग्रेस श्रेष्ठींवर दबाव तंत्राचा भाग असल्याचे बोलले जात आहे. भाजपने देखील अद्याप विखेंच्या उमेदवारीबद्दल भाष्य केले नाही. पक्षप्रवेशाचे स्वागत करू पण उमेदवारीचा ब्र शब्द काढला नाही. त्यामुळे आता विखे कोणता झेंडा हाती घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)