विजयसिंह मोहिते यांनाच माढ्यातून उमेदवारी देणार होतो

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गौप्यस्फोट


फोन बंद ठेऊनच भाजपप्रवेशाचा निर्णय घेतल्याचा दावा

पुणे – “माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच तेथून पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. पक्षनेतृत्व आणि प्रदेशाध्यक्षांनी त्यांना तशी माहितीही दिली होती. मात्र, त्यांनी दुसऱ्याच नावाचा आग्रह धरला होता. त्या नावाला माळशिरस वगळता अन्य तालुक्‍यांतील आमदारांनी विरोध दर्शविला होता,’ असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. स्वत: प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांना दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन “स्विच ऑफ’ लागत होता,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. “विजयसिंह मोहिते पाटील हे ज्येष्ठ असल्याने त्यांची लोकसभेची निवडणूक त्यांनीच लढवावी, असा आग्रह खुद्द शरद पवार यांनीच धरला होता. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करताना मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी दुसऱ्याच नावाचा आग्रह धरला होता. त्यानंतर पक्षाच्या वतीने त्यासंदर्भात चाचपणी केली असता माळशिरस वगळता सांगोला, माण, खटाव, फलटण या विधानसभा मतदारसंघातील आमदारांचा त्या नावाला विरोध होता. त्यानंतर मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी स्वत: शरद पवार, त्यांचे पीए, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य नेत्यांनी मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केला होता. मात्र, दोन दिवस त्यांचा फोन बंद होता. मोहिते पाटील यांनी फोन बंद ठेऊनच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला,’ असा आरोपही अजित पवार यांनी केला.

सुजय विखे पाटील यांना दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यास आमची तयारी होती. त्याला पक्षातील सर्वच नेत्यांनी सहमती दर्शवली होती. मात्र, त्यांचे घोडे कोठे अडले, हेच समजत नाही.
– अजित पवार, विधिमंडळ पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)