विजय मल्ल्याच्या शेअरविक्रीतून 1 हजार कोटी 

नवी दिल्ली – “युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग्ज लिमिटेड’ अर्थात “युबीएचएल’मधील फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याचे समभाग विकून तब्बल 1,008 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे. “युबीएचएल’मध्ये मल्ल्याचे 74 लाख समभाग होते. बेंगळूरुमधील कर्जवसुली लवादाने या समभागांची विक्री करण्यात आल्याचे सक्‍तवसुली संचलनालयाने आज सांगितले. विजय मल्ल्याच्या विरोधात “ईडी’च्या वतीने सुरू असलेल्या “मनी लॉंडरिंग’ प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून मल्ल्याची मालकी असलेले “युबीएचएल’चे समभाग जप्त करण्यात आले होते. हे समभाग येस बॅंकेमध्ये होते. कर्नाटक उच्च न्यायालयाने हे समभाग ताबडतोब कर्जवसुली लवादाकडे देण्याचे आदेश येस बॅंकेला दिले होते.

मल्ल्याच्या मोठ्या थकित कर्जाचा विचार करून “ईडी’ने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून “युबीएचएल’चे हे 74 लाख 4 हजार 932 समभाग विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विशेष न्यायालयाने या समभागांची 26 मार्च रोजी विक्री करण्यास परवानगी दिली. बेंगळूरुतील वसुली अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला या समभागांच्या विक्रीची नोटीस प्रसिद्ध केली आणि या समभागांच्या विक्रीमधून 1,008 कोटी रुपयांची वसुली, केली, असे “ईडी’ने सांगितले.

अशाप्रकारे समभागांची विक्री करण्याचे हे पहिलेच प्रकरण होते. यापुढे आगामी काही दिवसात अशाप्रकारे आणखी समभागांची विक्री केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे आणि 9 हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी त्याच्या विरोधात “ईडी’ आणि “सीबीआय’कडून संयुक्‍तपणे तपास केला जातो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)