Video : विठु नामानं रोटी घाट दुमदुमला…

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने पार केली चढण

सचिन आव्हाड

पाटस – संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी मार्गात रोटी घाट हा सर्वात अवघड टप्पा समजला जातो. तुकाराम महाराजांच्या पालखी रथास रोटी घाट पार करण्यासाठी पाच बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या तसेच विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी पालखी रथ ओढत होते. यामुळे हा अवघड टप्पा तुकोबारायांच्या पालखीने सहज पार केला. पाटस (ता. दौंड) येथील नागेश्वर महाराज मंदिरातील विसाव्यानंतर जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान रोटी घाटाच्या दिशेने झाले. पाटस गावातील अनेक भाविक संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत रोटी घाट पार करण्यासाठी आले होते. रोटी घाट आज वारकऱ्यांनी फुलून गेला होता. लाखो वारकरी टाळ, मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष करीत चालले होते. अनेक वारकऱ्यांनी भजन करीत, नाचत रोटी घाट पार केला. रोटी घाटात टाळ मृदुंगाचा आवाज आणि विठ्ठल नामाचा जयघोष घुमत होता. गवत उगवल्याने हिरव्या झालेल्या रोटी घाटात वारकऱ्यांच्या खांद्यावर डौलाने डोलणाऱ्या भगव्या पताका लक्षवेधी ठरत होत्या. रोटी घाट हा पालखी वर चढवण्याच्यादृष्टीने कठीण समजला जातो.

जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीस रोटी घाट पार करण्यासाठी सुमारे पाच बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. पाच बैल जोड्या पालखी ओढत असताना भाविकही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ पुढे ओढत होते. काही भाविक पालखी रथास पाठीमागुन धक्का देऊन पालखी रथ वर चढविण्यासाठी प्रयत्न करीत होते. एक वाजण्याच्या सुमारास जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने रोटी घाटाची अवघड चढण पार केली. घाट माथ्यावर पालखीची अभंग आरती करण्यात आली. पाटस येथे पालखीचे स्वागत सकाळी 8:30च्या सुमारास जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पाटस गावातील सर्व ग्रामस्थांनी पालखीचे भक्तीभावाने स्वागत केले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होताच पाटस गावातील ग्रामस्थांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पाटस गावातील नागेश्वर मंदिरात पालखी विसावली. यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पाटस गावात वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी आणि मोफत औषधे देण्यात आली, अनेक वारकऱ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. पाटस गावामध्ये वारकरी दिंड्याच्या जेवणाची व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आली होती. पाटस गावातील नागरिकांनी वारकऱ्यांना चहा, पोहे, फळे यांचे वाटप केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)