विदर्भाने पटकाविले विजेतेपद; अंतिम सामन्यात दिल्लीवर 4 विकेट्‌सने मात

23 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

हैदराबाद – 23 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भ संघाने दिल्लीवर चार गड्यांनी मात करत पहिल्यांदाच विजेतेपदावर आपले नाव कोरले. पवन परनाते याने केलेल्या नाबाद 88 धावांच्या जोरावर विदर्भाने यंदाच्या वर्षातील चौथे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले.

स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाणेफेक जिंकत विदर्भाचा कर्णधार मोहित काळे याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवित गोलंदाजांनी दिल्ली संघाला 211 धावांवर राखले. प्रत्युत्तरात विदर्भ संघाची सुरुवात निराशाजनक झाली. विदर्भाच्या वरिष्ठ संघाचे कर्तव्य बजावून थेट दाखल झालेल्या सलामीवीर अथर्व तायडे व अक्षय दुल्लरवार जोडी अपयशी ठरली. अथर्व (5), तर अक्षय (12) धावांवर झटपट बाद झाल्याने विदर्भाची 2 बाद 25 अशी अवस्था झाली.

त्यानंतर संघाचा यष्टीरक्षक पवन परताने आणि नयन चव्हाण यांनी संयमी फलंदाजी करत निर्णायक भागीदारी केली. अर्धशतकाकडे वाटचाल करीत असताना नयन चव्हाण (48) धावांवर योगेश शर्माचा बळी ठरला. परनाते व चव्हाण यांनी तिसऱ्या विकेट्‌ससाठी 103 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या मोहित काळेने संयमी फंलदाजी करत संघाला विजयासमीप समीप नेले. मात्र, संघाच्या 171 धावा झाल्या असताना मोहित (29) धावांवर तंबूत परतला.

एकीकडे विदर्भ संघ विजयी लक्ष्याचा सहज पाठलाग करेल, असे वाटत होते. मात्र, पार्थ रेखडे (2) आणि मोहित राऊत (0) धावांवर झटपट बाद झाल्याने विदर्भाची 6 बाद 178 अशी अवस्था करत दिल्लीने सामन्यात रंगत आणली. पण परनाते एका बाजूने संघाचा डाव सांभाळत 48.2 षटकांतच संघाला निर्धारित धावसंख्या गाठून दिले. पवन परनाने 132 चेंडूत 88 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून कुलदीप यादव याने 37 धावांत 4 गडी बाद केले. तर अभिषेक वत्स आणि योगेश शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्यापूर्वी पार्थ रेखडेच्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीपुढे दिल्ली संघाचा डाव 50 षटकांत 211 धावांवर संपुष्टात आला. दिल्लीकडून कर्णधार ललित यादव (65), सुमीत माथुर (52) आणि वैभव कंडपाल (39) धावा वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. विदर्भाकडून पार्थ रेखडे याने 33 धावांत 4 गडी बाद केले. तर नचिकेत परांडेने दोन आणि ए. देशपांडेने एक गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)