पुण्याचा श्‍वास आणखी किती गुदमरणार?

– अंजली खमितकर

पुणे – “येत्या दिवाळीपर्यंत पुण्यात आणखी दोन लाख वाहने रस्त्यावर धावणार,’ हे वाक्‍य ऐकल्यानंतर “अरे व्वा’ असे म्हणण्याऐवजी “अरेरे’ असे खेदाने म्हणावे लागेल, अशी आजची पुण्यातील हवा प्रदूषणाची परिस्थिती आहे. गाडी घेतल्याचा साहजिकच प्रत्येकाला आनंद होतोच, परंतु त्याचबरोबर आपण प्रदूषणवाढीकडे एक पाऊल टाकतो, ही दु:खाची गोष्ट त्याबरोबर येते. त्यामुळे जेवढ्या वेगाने शहर “स्मार्ट’च्या दिशेने जात आहे, तेवढ्याच वेगाने ते प्रदूषणाच्या गर्तेत जात आहे. याची जाणीव शहराबाबतचे निर्णय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि स्वत:चे वाहन बाळगणाऱ्या नागरिकाला असली पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालानुसार, पुण्यात सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या वाहनांविषयीचा तपशील धक्कादायक आणि अनियंत्रित आहे. यावर्षी 36 लाख 27 हजार 280 वाहनांची नोंद झाली. त्यापैकी मोटरसायकलची संख्या 27 लाख तीन हजार 147, चारचाकींची संख्या सहा लाख 45 हजार 683 आहे, तर अन्य वाहनांची संख्या दोन लाख 78 हजार 450 इतकी आहे. दरवर्षी या संख्येत दोन लाखांची भर पडतेच, जी भर अनियंत्रित आहे.

ही शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची संख्या आहे मात्र शहरात अन्य शहरांमधून, गावांमधून, परिसरामधून कामानिमित्त पुण्यात येऊन जाणाऱ्यांच्या संख्येचा विचार केला तर ती मोजण्यापलिकडे आहे. हवेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचे प्रदूषण होते या गोष्टींचा उहापोह करण्यात आता काहीच अर्थ राहिला नाही. त्यामुळे त्याच्या तपशीलात जाण्यातही काही अर्थ नाही. आता थेट उपाययोजना करण्याची वेळ आली आहे; परंतु ती उपाययोजना करणारे मात्र अजूनही उदासीनच आहेत, हे आजच्या परिस्थितीवरून लक्षात येते.

इलेक्‍ट्रिक बसेसना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे पर्यावरण अहवालात म्हटले आहे. इलेक्‍ट्रिक बस आणण्याचा घाटही महापालिकेने घातला. परंतु, या बस चार्जिंग पॉईंटची व्यवस्था केली आहे का? हा विचार आधी करणे आवश्‍यक आहे. आर्थिक गणितांभोवती फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी केवळ “स्मार्ट सिटी प्रोग्राम’ नावाच्या गोंडस नावाखाली इलेक्‍ट्रिक बसचे “जुगाड’ मांडले आहे. हा उपाय चांगला असला, तरी त्यासाठी लागणारे पुरेसे मुलभूत इन्फ्रास्ट्रक्‍चर आधी उभारणे आवश्‍यक आहे.

याशिवाय 12 वर्षांपेक्षा जास्त जुन्या बसेसना वापरातून बाद करण्याचा सल्ला पर्यावरण अहवालात दिला आहे. प्रत्यक्षात कित्येक वर्षे जुन्या बसेस आहेत, याची आकडेवारी महामंडळाच्या नियोजनमंडळावर असणाऱ्यांनाही माहित नाही. आहे त्याच बसेस दुरुस्त करून रस्त्यांवर आणले जातात. त्यामुळेच बस बंद पडण्याचा रोजचा आकडा हा 140 बसचा आहे. ही वरवर साधी गोष्ट वाटत असली, तरी ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे.

सीएनजी बसेसचीही अवस्थाही इलेक्‍ट्रिकसारखीच आहे. सायकल वापराला प्रोत्साहन देण्याचा सल्लाही यामध्ये आहे. ही बाब देखील चांगली असली तरी रस्ते, खासगी वाहने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या गुंत्यातून रस्त्यावरून सायकल बाहेर काढणे प्रत्यक्षात किती शक्‍य आहे याचाही विचार अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये केवळ प्रयोगशीलता एवढ्यापुरते मर्यादित न राहता विरोधाला न जुमानता ठोस उपाययोजना, सक्ती केल्याशिवाय ते होणार नाही हे देखील तितकेच खरे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)