वाहन वितरकांनो, “हॅंडलिंग चार्जेस’ घ्याल तर यापुढे फौजदारी गुन्हा

परिपत्रकाद्वारे  राज्य शासनाने कान पिळल्यानंतर “आरटीओ’ला प्रशासनाला जाग : खरेदीदारांची लूट थांबणार

पुणे – वाहन खरेदी करताना नागरिकांकडून “आरटीओ’ तसेच हॅंडलिंग चार्जेसच्या नावाखाली जादा पैसे उकळण्याऱ्या वाहन वितरकांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. काही वाहन वितरक दुचाकी आणि चारचाकीसाठी पैसे उकळत असल्याचे समोर आले होते. यावर राज्य शासनाने परिपत्रक काढले असून सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

नव्या वाहनांची खरेदी करताना वाहनाची मूळ किंमत, विविध कर आणि अधिभारांसह वाहन वितरक “आरटीओ चार्जेस’ किंवा “हॅंडलिंग चार्जेस’ म्हणून जादा रक्कम वसूल करतात. हे अतिरिक्त शुल्क नियमबाह्य असल्याची माहिती सामान्य नागरिकांना नसते. मात्र, काहीजण त्याबाबत विचारणा केल्यानंतर वाहन नोंदणीसाठी आरटीओशी संबंधित प्रक्रिया करण्यासाठी संबंधित शुल्क भरावे लागत असल्याचे उत्तर दिले जात होते.

यासंदर्भात काही तक्रारी आल्यानंतर हा प्रकार “आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. “आरटीओ चार्जेस’च्या नावाखाली दुचाकीसाठी पाचशे ते दीड हजार रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी दोन ते तीन हजार रुपये जादा शुल्क घेतले जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर “आरटीओ’ने वाहन वितरकांना सूचनाही दिल्या होत्या. यानंतर आता राज्य शासनाने संबंधित प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.

 

शोरुमच्या दर्शनी भागात फलक –
वाहन नोंदणी शुल्क व कर याशिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत नाहीत. यासंदर्भात काही तक्रार असल्यास विक्री व्यवस्थापकाशी संपर्क साधावा. तसेच, आरटीओ कार्यालयाकडे लेखी, टपालाद्वारे किंवा http//transportcomplaints.mahaonlinegov.in या पोर्टलवर तक्रार दाखल करावी. गरज भासल्यास ग्राहक संरक्षण मंच आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, या आशयाचा फलक शो-रूमच्या दर्शनी भागात लावण्याची सूचना सर्व वाहन वितरकांना करावी, असे राज्य सरकारने “आरटीओ’ला सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)