#वेध : वाहतूक क्षेत्रातली अभिनव संकल्पना (भाग 1)

-विश्वास सरदेशमुख

वाहतूक हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा असतो. मालवाहतूक असो वा प्रवासी वाहतूक यातून पैशाची प्रचंड उलाढाल होत असते. आता केंद्र सरकार सार्वजनिक वाहतुकीसाठी एक कार्ड लागू करण्यासाठी एक योजना आखत आहे. “वन नेशन वन कार्ड’ असे या योजनेचे नाव आहे. या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचे भाडे या कार्डद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे भारतीय वाहतूक क्षेत्राचे रूपच बदलून जाईल अशी अपेक्षा आहे.

जीएसटीच्या रूपाने “एक राष्ट्र एक कर’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवल्यावर आता केंद्र सरकार सार्वजनिक वाहतुकीसाठी “एक राष्ट्र एक कार्ड’ ही योजना आणत आहे. या योजनेंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतुकीसाठी एकच कार्ड वापरता येईल. ब्रिटनसारख्या देशांत अशी योजना आधीपासूनच सुरू आहे. लंडनसारख्या महानगरांमध्ये ही प्रणाली यशस्वीपणे कार्यरत आहे. यात तुम्ही एक कार्ड खरेदी करता आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या प्रवासासाठी म्हणजे बस, मेट्रो आणि लोकलसाठी वापरू शकता.

ही संकल्पना जर चांगल्या तऱ्हेने अंमलात आली तर प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही प्रकारच्या वाहतुकींतील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. आपल्याकडील सार्वजनिक वाहतूक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. पण या क्षेत्राचा कणा म्हणजे प्रवासी याच्या सोयीचा आणि सुविधेचा विचारच केला जात नाही. प्रवासाचे कोणतेही माध्यम निवडले तरी प्रवाशाच्या नशीबी दगदग आणि धावपळ ही ठरलेली असते. समजा अ नावाच्या गावाला जाण्यासाठी एखाद्या प्रवाशाने तिकीट काढले आणि काही कारणाने ती बस चुकली तर त्याच गावाला जाणाऱ्या दुसऱ्या बसमधून जातानाही त्याला नवे तिकीट घ्यावे लागते.

वन नेशन वन कार्ड ही संकल्पना लंडनमधील ऑयस्टर कार्ड योजनेवर आधारलेली आहे. युनायटेड किंगडम (ब्रिटन)मधील ग्रेटर लंडनमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी ऑयस्टर कार्ड हे इलेक्‍ट्रॉनिक तिकीट म्हणून वापरले जाते. हे कार्ड लंडनमधील सर्व प्रकारच्या म्हणजे भूमिगत, बसेस, डॉकलॅंड्‌स लाईट रेल्वे, रस्त्यावरील वाहतूक, ट्रामलिंक, नदीतील काही बोट सेवा आणि लंडनमधील जिथे भाडे घेतले जाते अशा क्षेत्रांतील बहुतांश राष्ट्रीय रेल्वे सेवांत हे कार्ड भाडे देण्यासाठी वापरले जाते. जून 2003मध्ये हे कार्ड सुरू झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत 8 कोटी 60 लाख लोकांनी ते वापरले आहे. ऑयस्टर कार्ड हे निळ्या रंगाचे क्रेडीट कार्डच्या आकाराचे स्मार्टकार्ड आहे आणि त्यात सिंगल तिकीटे, मुदत तिकीटे आणि प्रवास परवाने धारण केलेले असतात. प्रवासी वाहतूक व्यवस्थेत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना वैधतेसाठी किंवा पैसे काढण्यासाठी त्याला स्पर्श करतात. हे कार्ड ऑनलाईन, क्रेडीट कार्ड टर्मिनल्सवर, रोख पैसे देऊन संबंधित प्राधिकरणाकडून खरेदी करता येते. तिकीट खिडकीवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी हे कार्ड सुरू करण्यात आले आणि अल्पावधीतच ते प्रवाशांत लोकप्रिय झाले.

बस एसटी महामंडळाची असते, कंडक्‍टर, ड्रायव्हर एसटी महामंडळाचे असतात, पण प्रवाशांची सोय बघायचीच नाही, हे ठरलेले असते. बिचारा प्रवासी कुरकुरत नवे तिकीट घेतो. या कार्डमुळे प्रवाशांना अशा प्रकारे बसणारा भुर्दंड बंद होईल.
फ्युचर मोबिलीटी समिट-2018 मध्ये नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमिताभ कांत यांनी ही संकल्पना मांडली. यामुळे भारतीय वाहतूक क्षेत्राचे रूपच बदलून जाईल अशी अपेक्षा आहे.

वाहतूक क्षेत्रातली अभिनव संकल्पना (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)