दखल : धामारी गावाने जपला क्रांतिकारक फडकेंचा वारसा

-विठ्ठल वळसे-पाटील

1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर अखंड हिंदुस्तानात ब्रिटिश साम्राज्याविरोधी जनमनात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. ब्रिटिशविरोधी निर्माण झालेला असंतोष याच कालखंडात एका क्रांतिकारकाकाने ब्रिटिशांविरोधी सशस्त्र क्रांतीचे पाऊल उचलले ते महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके होत.

देशकार्यासाठी लागणारी आर्थिक मदत म्हणून शिरूर (पुणे) तालुक्‍यातील शिक्रापूर-पाबळ रस्त्यावरील धामारी या गावात श्रीमंत सावकारांवर दरोडा टाकून त्या काळी 3 हजार रुपये जमा केले शिवाय गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीचीही सोडवणूक केली त्या धामारी गावाने गावच्या प्रवेशद्वाराला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देउन स्वातंत्र्य संग्रामाच्या पाऊल खुणा जपल्या आहेत त्या महान क्रांतिकारकांचे नुकतेच 17 फेब्रुवारी रोजी पुण्य स्मरण केले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धामारी गावाने दोन वर्षापुर्वी गावच्या वेशीला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नामकरण केले. ही वेस प्रवाशांना आकर्षित करत आहे. गावात जुन्या पद्धतीचे वेश असून या गावात जागृत खंडोबाचे देवस्थान असून या बरोबर विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर, मातोबा मंदिर, मशिद, तसेच 10 वी पर्यंत शाळा असून गावातील सर्व मंदिरेसुद्धा शोभिवंत आहेत सध्या या गावाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे.

फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरढोण येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे येथे पार पडले नंतर त्यांनी रेल्वे, नंतर ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजात लेखनिक म्हणू नोकरी केली अखेर लष्करात हिशोब खात्यात लागले. त्याचवेळी आई आजारी पडली रजा न मिळाल्याने अखेरची भेट होऊ शकली नाही. यातून ब्रिटिशांविरोधी चीड निर्माण झाली ही पुढे क्रांतीची ज्योत ठरली. फडके यांच्यावर महादेव गोविंद रानडे यांच्या विचारांचा प्रभाव होता.

फडके यांनी 22 ते 27 फेब्रुवारी 1879 रोजी धामारी, लोणी व खेडवर दरोडा टाकला. पुढे जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीतल्या जमा रकमेतून ब्रिटिश विरोधी सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. यासाठी त्यांनी मुबंई व इतर ठिकाणी श्रीमंत व्यापारी सुशिक्षित वर्गाकडे आर्थिक मदत मागितली पण यात निराश पदरी पडली. पुढे फडके यांनी महाराष्ट्रातील मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. यात मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले त्यांस शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या ‘सैन्यात’ भरती केले.

काही सैनिकांसह त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. सैनिकांच्या चरितार्थ साठी शिरूर खेड भागातील सरकारी खजिना लुटला. पुढे पुण्यावर चाल करून काही दिवसांकरता पुणे ताब्यात घेतले. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव मोडून काढण्याची तयारी केली गाणगापूरजवळील धानूर गावाजवळ झालेल्या लढाईनंतर सरकारने फडक्‍यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर दाखल म्हणून फडक्‍यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास मोठे इनाम जाहीर केले ! यातून क्रांतिची मशाल अधिक तेवत राहिली.

या लढाईनंतर फडके यांनी अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. परंतु तेथेही प्रतिसाद लाभला नाही. पुढे गंगापुरात असताना रघुनाथ भट यांचं साह्याने रोहिल्यांचे प्रमुख इस्माईल खान याची भेट घेतली व मोठे संख्याबळ उभे केले याचा सुगावा ब्रिटिशांना लागला तेथून फडके यांनी पळ काढला पुढे जुलै 20, इ.स. 1879 रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदगी गावातील देवळात ब्रिटिशां विरोध संघर्ष झाला ब्रिटिश सरकारने फडके यांना जिवंत पकडले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला.

पुण्यातील सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेऊन बचाव करण्याचा प्रयत्न केला. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. अरेबियातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्‍यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून पळून जाण्यात यशस्वी झाले. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.

आपल्याला मिळत असलेल्या वागणुकी विरुद्ध फडके यांनी आमरण उपोषण केले अखेर अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी 17 फेब्रुवारी 1883 रोजी देह त्याग केला. श्रीदत्त भक्त असलेल्या वासुदेव फडके यांचा लढा इतिहासात एकाकी, तसेच अनुयायी भेटले नाही, शस्त्रसामग्रीही मिळाली नाही. तरी पुढे अनेक क्रांतिकारकांनी या लढ्यापासून प्रेरणा घेतली.

स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा क्रांतिकारकांचा ईतिहास नव्या पिढी समोर ठेवला नाही तर भविष्यात देशात देशविरोधी कारवाया करणारी पिल्लावळ जन्मतच राहील यासाठी धामारी गावचा आदर्श इतर गावांनी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)