तुकाराम महाराज पालखीसाठी वरवंड सज्ज

ग्रामपंचायत, प्रशासनाची तयारी पूर्ण : विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात साफसफाई
गावात 11 ठिकाणी शौचालय युनिट : 200 शॉवरची व्यवस्था

वरवंड  – संत तुकाराम महाराजांची पालखी रविवार (दि. 30) रात्री वरवंड (ता. दौंड) येथे मुक्कामी येणार आहे. वरवंड गावातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. पालखीच्या मुक्कामाची आणि पालखीसोबत येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वरवंड ग्रामपंचायत, समस्त ग्रामस्थ आणि प्रशासन सज्ज झाले आहे.

वरवंड गावात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असतो. पालखीच्या मुक्कामासाठी वरवंड ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि वरवंडच्या ग्रामस्थांमार्फत योग्य नियोजन करण्यात आले आहे. पालखी मुक्कामाच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात साफसफाई करण्यात आली असून, येथील परिसराचीही स्वच्छता करण्यात आली आहे. याबरोबरच मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

वरवंड गावात पालखीच्या स्वागताची तयारी पूणर झाली असून, पालखी मार्गावरील सर्व खड्डे बुजवण्यात आले आहेत. लाईट आणि पाण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती सरपंच गोरख दिवेकर यांनी दिली. वरवंड गावात पालखीचा मुक्काम असल्याने सुमारे सातशे स्वच्छतागृह सरकारकडून देण्यात आले आहेत. गावात 11 ठिकाणी हे शौचालय युनिट बसवण्यात आले आहेत.
वारकऱ्यांच्या आंघोळीसाठी सुमारे 200 शॉवर बसण्यात आले आहेत. यातील 150 शॉवर पालखी तळावर, तर 50 शॉवर बजारतळावर बसवण्यात येणार आहेत, तसेच सहा हायमॅक्‍स दिवे बसवण्यात आले आहेत. यातील पालखीतळावर 4, तर बजारतळावर 2 दिवे बसविण्यात आले आहेत. वरवंड गावात सुमारे 50 ते 60 एलइडी दिवे बसवण्यात आले आहेत.

गावात पालखीचा मुक्काम असल्याने ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासन पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पालखी मार्गावर आणि पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी 12 सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला असून, वारकऱ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील पाणीपुरवठा चोवीस तास करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच गोरख दिवेकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)