माणगाव परिषद शताब्दीनिमित्त विद्यापीठातर्फे वर्षभर विविध उपक्रम: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

कोल्हापूर – माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठासह माणगाव येथेही विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी घोषणा प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केली. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने माणगाव परिषद शताब्दी वर्षाचे औपचारिक उद्घाटन आज प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शिर्के म्हणाले, माणगाव परिषद ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नेहबंध निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या दोघांचे परस्परसंबंध, मैत्रभाव दर्शविणारी कागदपत्रे, पत्रे, छायाचित्रे आदींचे संकलन करण्याबरोबरच संशोधन, चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात यावीत. माणगाव परिषदेत जे महत्त्वाचे ठराव करण्यात आले, त्यासंदर्भात गेल्या शंभर वर्षांत आपण किती प्रगती केली, याचाही संशोधकीय धांडोळा केंद्राच्या वतीने घेण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आलोक जत्राटकर यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे स्नेहबंध’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, बाबासाहेब आणि शाहू महाराज यांचा एकमेकांशी परिचय झाल्यानंतर अवघ्या तीनेक वर्षांत महाराजांचे निधन झाले. तथापि, लंडनला उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यास जाईपर्यंत अवघे काही महिने प्रत्यक्ष आणि त्यानंतर त्यांच्या निधनापर्यंत पत्रव्यवहाराद्वारे अप्रत्यक्ष संवाद कायम राहिला.

त्या दोघांमध्ये एकमेकांप्रती निर्माण झालेला मैत्रभावाचा ओलावा त्यांच्या पत्रव्यवहारातून पाहायला मिळतो. माणगाव येथे २१-२२ मार्च १९२० रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृतांची पहिली परिषद आणि त्यानंतर ३०-३१ मे १९२० रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद या दोन परिषदा या दोघांचे विचार व स्नेहसंबंध समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बाबासाहेबांना ‘मूकनायक’ सुरू करण्यासाठी त्या काळात सुमारे २५०० रुपयांची देणगी देणे असो की, लंडनला रवाना होत असताना त्यांना दिलेला १५०० रुपयांचा निधी असो, या घटना म्हणजे शाहू महाराजांचे त्यांच्यावरील प्रेम दर्शविणाऱ्या आणि त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षाच व्यक्त करणाऱ्या आहेत. भारताच्या सामाजिक चळवळीला या दोन व्यक्तीमत्त्वांनी प्रदान केलेले अधिष्ठान आणि प्रेरणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांचा संशोधकीय अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या दोघांच्या स्नेहबंधाच्या अनुषंगाने ध्वनीचित्रफीतीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.)ग.गो. जाधव अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित, ज्येष्ठ पत्रकार-संपादक जयसिंग पाटील, डॉ. सर्जेराव पद्माकर, कास्ट्राईबचे आनंद खामकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

माणगाव परिषदेबाबत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने माणगाव परिषदेबाबत कागदपत्रे, छायाचित्रे, आठवणी यांचे संकन करण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून ज्यांच्याकडे त्या संदर्भातील कागदपत्रे असतील, त्यांनी ती केंद्राकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले आहे.

शताब्दीनिमित्त पहिले व्याख्यान शनिवारी
माणगाव परिषदेच्या शताब्दीच्या निमित्ताने आंबेडकर केंद्राच्या वतीने वर्षभरात विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मालेतील पहिले पुष्प प्रा. विनय कांबळे गुंफणार आहेत. “माणगाव परिषद आणि तिचे सामाजिक राजकीय संदर्भ” या विषयावर प्रा. कांबळे यांचे व्याख्यान येत्या शनिवारी (दि. २३ मार्च) सकाळी १०.३० वाजता केंद्रात आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)