रिपब्लिकन पार्टी एकतावादी, मिल मजदूर संघ व निवृत्त कृषी अधिकाऱ्यांचा समावेश
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्र पक्ष यांच्या आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना विविध संघटना आणि पक्षांनी पाठिंबा जाहीर केला असून प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सक्रिय राहण्याचा संकल्प केला आहे. निवृत्त कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मुंबईची कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांचा त्यामध्ये समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील निवृत्त कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्र पक्ष यांच्या आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना आज प्रत्यक्ष भेटून निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. सेवानिवृत्त कृषी अधिकारी, कर्मचारी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष के. जी. धुमाळ, उपाध्यक्ष दीपक काळे, चिटणीस विनायकराव देशमुख, कार्यकारिणी सदस्य आबासाहेब भोसले, व्ही. बी. साबळे, श्री. अनुगडे, श्री. खापे आदींसह प्रमुख सदस्यांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंब्याचे पत्र खा. उदयनराजे भोसले यांना सादर केले. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीनेही पाठिंबा जाहीर केला आहे.
याबाबतचे लेखी पत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगारामनाना इंदिसे यांनी नुकतेच खा. उदयनराजे भोसले यांना सादर केले आहे. याबाबत श्री. इंदिसे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यावर पक्षाचे उपाध्यक्ष विजय यादव, दौलतराम, हरिदास टेंभूर्णे, रामदास महात्रे, खजिनदार राजू भुरे, जनरल सेक्रेटरी प्रल्हाद सोनवणे, उत्तम खडसे, प्रा. राहुल मून आदींच्या सह्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मुंबई यांच्यावतीने कामगार संघटना संयुक्त कृती समितीनेही खासदार उदयनराजे भोसले यांना निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे.