Video : नीरेत माऊलींच्या पादुकांचा स्नानसोहळा 

पुणे जिल्ह्याचा निरोप घेत पालखी वैभवी लवाजम्यासह लोणंदला रवाना 

राहुल शिंदे 

नीरा: माऊली-माऊली नामाच्या जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या निनादात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. हजारो वारकरी व भाविक भक्तांनी हा स्नानसोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी नीरेच्या काठावर गर्दी केली होती. नीरा स्थानांतर माऊलींचा पालखी सोहळा आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामी दाखल झाला.

रामायणकार वाल्मीकींच्या पुणे जिल्ह्यातील वाल्हा गावचा सकाळी लवकर निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा नीरानगरीकडे मार्गस्थ झाला होता. सकाळच्या न्याहरीसाठी पिंपरे खुर्द येथील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहीरींच्या समोर सोहळा विसावला. पिंपरे खुर्द येथील सरपंच लता थोपटे, उपसरपंच राजेंद्र थोपटे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक दिलीप थोपटे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र थोपटे, ग्रामपंचायत सदस्य विलास थोपटे, यांच्यासह जि.प. शाळेचे व बाबालाल साहेबराव काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी परंपरे प्रमाणे ग्रामीण भागातील भाविकांनी वारकऱ्यांना न्याहरीसाठी भाजी भाकरी आणली होती, त्याचा आस्वाद वारकऱ्यांनी घेतला.

नीरा नगरीत माऊलींचा पालखी सोहळा 11:00 वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालया समोरील शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत, सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले, सदस्य अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, माजी सरपंच चंदरराव धायगुडे, माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, लक्ष्मणराव चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सुभाष लिंबरकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी नदीकिनारी असलेल्या नयनरम्य पालखीतळावर दर्शनासाठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगा लावून माऊलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला विशेष महत्त्व आहे. यावेळी पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पूर्ण होऊन माऊलींचा सोहळा हा वारीचा सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांची जन्म भुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशा करतो; तत्पूर्वी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घातले जाते. दुपारचे भोजन आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी 01:00 वाजता सोहळा मार्गस्थ झाला. नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकलीन पुलावरून सर्वात पुढे मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह दत्त घाटावर दखल झाला. माऊली माऊली नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर तसेच नदी काठावर एकच गर्दी केली होती.

माऊलींच्या स्नानानंतर पालखी सोहळ्याला प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेझ हक्क, अप्पर पोलीस अधीक्षक (पुणे) तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी (भोर-पुरंदर) अशोक भरते, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विस्वास देवकाते, सीईओ सुरज मांढरे, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, पुरंदरचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर आदी पदाधिकाऱ्यांनी निरोप दिला. तर सातारा जिल्हाधिकारी श्वेता शिंघल, सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप पाटील, वाईचे प्रांताधिकारी अस्मिता मोरे, खंडाळा तालुक्‍याचे तहसिलदार विवेक जाधव, कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू यांसह सातारा जिल्हा प्रशासनातील पदाधिकाऱ्यांनी पाळखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)