वर्धन ऍग्रोची ऊस दरात जिल्ह्यात आघाडी

पहिली उचल 2600 जाहीर : संचालक मंडळाचा निर्णय
पुसेसावळी – वर्धन ऍग्रो साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पहिली उचल 2600 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चेअरमन धैर्यशील कदम यांनी दिली. कारखाना कार्यस्थळावर आज संचालक मंडळ व शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी चेअरमन धैर्यशील कदम यांनी दिनांक 16 मार्चपासून कारखान्याकडे गळितास येणाऱ्या उसाला पहिला हप्ता प्रति टन 2600 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला. कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम जोमात सुरू असताना शेतकऱ्यांच्या उसाला हक्काचा दर मिळावा म्हणून कारखान्याचे व्यवस्थापन नेहमी प्रयत्नशील असते.

मोठ्या प्रमाणावरील परजिल्ह्यातून होणाऱ्या उसाची पळवापळवी रोखण्यासाठी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी व सभासदांचा कारखान्यावरील विश्‍वास दृढ करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. यावेळी ज्येष्ठ संचालक भिमरावकाका पाटील, संपतराव माने, हिंदुराव चव्हाण, सुदाम दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले.
कारखान्यातील कर्मचारी कै. धनाजी पाटील यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबियांसाठी संचालक मंडळाच्या वतीने मदत जाहीर करण्यात आली व मदतीचा धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली. जि. प. सदस्य सागर शिवदास, सुहास पिसाळ, पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब निकम, सर्व संचालक सभासद शेतकरी, हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार संचालक भीमराव डांगे यांनी मानले.

या विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही. शेतकऱ्यांनी शिल्लक राहिलेल्या ऊसाची नोंद त्वरित कारखान्याच्या शेती विभागाकडे करावी.
-धैर्यशील कदम ,चेअरमन वर्धन ऍग्रो

जास्तीत जास्त लोकांनी ऊस वर्धन ऍग्रो कारखान्यात गळीतास पाठवून ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे. संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी तंतोतंत करण्यात येईल.
-विक्रमशिल कदम ,कार्यकारी संचालक वर्धन ऍग्रो

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)