वंचित बहुजन आघाडीचा फटका कुणाला बसणार?

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांच्यात थेट लढत होईल असे वाटत होते. पण इथे वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार सर्वांच्या आधीच जाहीर केल्याने इथे तिरंगी लढत होणार हे निश्‍चित झाले. आता या मतदारसंघातील चित्र बरेच स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे कुणाला फटका बसणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे.

– विदुला देशपांडे 

बुलढाणा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. येथील विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनाच याही वेळी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे आणि राष्ट्रवादीतर्फे राजेंद्र शिंगणे हे निवडणूक रिंगणात आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे बाळाराम शिरसकर हे या मतदारसंघातील उमेदवार आहेत. यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. एरवी इथे दुरंगी लढत झाली असती. वंचित बहुजन आघाडीच्या सामर्थ्याचा अंदाज अद्याप तरी कुणी बांधलेला नाही. पण या आघाडीच्या उमेदवाराचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसेल असा अंदाज व्यक्त होत आहे. कदाचित म्हणूनच वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करायचा प्रयत्न कॉंग्रेस करत होता, पण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ताठर भूमिका घेतल्याने ही आघाडी झाली नाही. पण कॉंग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू होते.

बाळाराम शिरसकर हे अकोला जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्याबाहेरचा उमेदवार देण्यामागे वंचित बहुजन आघाडीचे जातीचे राजकारण आहे. शिरसकर हे माळी समाजातील आहेत आणि बुलढाणा मतदारसंघात माळी समाजाची संख्या मोठी आहेत. याचा फायदा शिरसकर यांना होण्याची शक्‍यता आहे. शिवाय या मतदारसंघात भारिप बहुजन महासंघाच्या म्हणून काही खास जागा आहेत. म्हणूनच काही प्रमाणात दलित मते आणि एमआयएममुळे काही प्रमाणात मुस्लिम मते शिरसकरांना मिळतील असा वंचित बहुजन आघाडीचा दावा आहे.

शिवसेना -भाजप युतीला वाटते की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन होईल. कारण दलित आणि मुस्लिम हे दोघेही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पारंपरिक मतदार आहेत. अलिकडच्या काळात हे दोन्ही मतदार भाजप आणि शिवसेनेकडे वळले असले तरी या दोन्ही समाजांतून भाजप-शिवसेनेला एकगठ्ठा मतदान कधी होत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो.

शिवसेनेचे सध्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. सध्या त्यांचे पारडे जड वाटत असले तरी प्रत्यक्षात त्यांना ही निवडणूक बरीच अवघड जाईल अशी चिन्हे आहेत. गेल्या वेळी मोदी लाटेचा फायदा जाधव यांना मिळाला. आता मात्र त्यांच्याविषयी नाराजी आहे. शिवसेनेतीलच एक गट त्यांच्या विरोधात आहे. भाजपतील चैनसुख संचेती आणि सागर फुंडकर यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती. स्वतंत्रपणे लढावे लागेल असे त्यांना वाटत होते. पण आता युती झाली त्यामुळे आपली संधी गेले असे भाजपतील स्थानिक नेत्यांना वाटत होते. अर्थात शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेला आहे. त्यामुळे गेल्या वेळचा जाधव यांचा विजय फक्त मोदी लाटेमुळे होते हे मानणे चुकीचे आहे. मात्र भाजप आणि शिवसेना यांच्या नाराज नेते आणि कार्यकर्ते यांची समजूत घालून त्यांना एकोप्याने बरोबर घेण्यात जाधव यांना यश आले तर ते आपल्या विजयाची पुनरावृत्ती करू शकतात.

राजेंद्र शिंगणे वास्तविक यावेळी निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. पण त्यांना तयार करण्यात आले. आता त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा नसली तर ते जाधव यांचा मुकाबला कसा करणार हा प्रश्‍न आहे. त्यांनी मनापासून निवडणूक लढवण्याचे ठरवले तर ते चांगली लढत देऊ शकतात. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत सध्या एकोपा आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. शिंगणे यांच्याबद्दल जनतेतही ममत्व आहे. सगळ्याच पक्षांत त्यांचे मित्र आहेत. पण मुळात आपण निवडणूक जिंकायची आहे हे त्यांच्या मनाने घेतले तरच ते चांगल्याप्रकारे लढू शकतात. त्यातच शिरसकर यांच्या आगमनाने राष्ट्रवादीच्या हक्काच्या व्होटबॅंकेला भगदाड पडण्याची शक्‍यता आहे. ते आव्हानही त्यांना पेलायचे आहे.

2014मध्ये होती तशी मोदी लाट आता नाही असा दावा विरोधक करतात. पण यावेळी निवडणुकीत जे मुद्दे उपस्थित करण्यात येतील त्यांची उत्तरे विरोधकांकडे नाहीत. सर्वात मोठा मुद्दा आहे तो राष्ट्रवाद आणि देशप्रेमाचा. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली त्याने सर्वसामान्य जनतेत त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला आहे. यावर मात करण्याचे आव्हान सगळ्याच विरोधी पक्षांच्या उमेदवारांपुढे आहे. तसे ते बुलढाणा मतदारसंघात शिंगणे यांच्यापुढे आहे. देशप्रेम हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा झाला तर त्याला ठोसपणे सामोरे जाण्याची क्षमता विरोधी पक्ष दाखवू शकत नाहीत. मुळात देशप्रेम हा वादाचा विषय नाहीच, पण तो विरोधी पक्षांनी वादाचा बनवला आणि आता आपल्याच जाळ्यात ते अडकले आहेत.

बुलढाणा मतदारसंघातही त्याचे पडसाद पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीला अतिशय सावध अशी रणनीती आखावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)