विविधा: वामन कृष्ण चोरघडे

माधव विद्वांस

लघुकथा लेखक, स्वातंत्र्यसैनिक प्राचार्य वामन कृष्ण चोरघडे यांची आज जयंती. त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे 16 जुलै, 1914 रोजी झाला. ते 12 भावंडांमध्ये सगळ्यात लहान होते.त्यांच्या 12 भावंडांपैकी फक्‍त चारच जगली. त्यांचे प्राथमिक शिक्षण काटोल येथे पार पडले. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण त्यांना घेणे अवघड होते.त्यांची शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन त्यांचे थोरले बंधू त्यांच्या पाठीशी उभे राहिले.त्यांनी नागपूर येथील पटवर्धन हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. ते व त्यांचे भाऊ एक खोली भाड्याने घेऊन काटकसरीत राहात होते. दोन्ही भावांनी उसाच्या रसाची गाडी घेतली व त्यावर गुजराण केली. पुढे मोठ्या भावाने शिक्षण सोडून नोकरी धरली व चोरघडे मॅट्रिकनंतर मॉरिस कॉलेजमध्ये दाखल झाले. चोरघडे यांनी मराठी साहित्य व अर्थशास्त्र या विषयांत पदवी मिळवली.

एम. ए. झाल्यावर वामन चोरघडे वर्ध्याला शिक्षक म्हणून हजर झाले. त्यावेळी त्यांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे यांच्याशी परिचय झाला. तुरुंगात त्यांनी खादीचे व्रत घेतले व मृत्यूपर्यंत पाळले.

वर्ष 1932 मध्ये “अम्मा’ लघुकथा प्रसिद्ध झाली. त्यांच्या कथा वागीश्‍वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होऊ लागल्या व ते लेखक म्हणून ओळखले जाऊ लागले. याच सुमारास लेखिका डॉ. वेणू साठे यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्यांनी शाळेतील पाठ्यपुस्तकांसाठी योगदान दिले. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच सुमारास त्यांची तुरुंगातून मुक्‍तता झाली. त्यानंतर ते वर्ध्याच्या गांधी परिवाराशी संबंधित असलेल्या “गोविंदराम सकसेरिया’ वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

इ.स. 1949 साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच चोरघडे प्राचार्य म्हणून 1974 साली निवृत्त झाले. महाराष्ट्राचे मंत्री रामकृष्ण पाटील यांनी चोरघडे यांना मानद अन्नपुरवठा अधिकारी हे पद दिले होते. पुढे कॉंग्रेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यावेळी विविध शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांनी श्रमसंस्कार पथक स्थापन केले. वि. स. खांडेकर यांनी त्या काळच्या पाच कथाकारांत त्यांची गणना केली होती. मराठी लघुकथेचा इतिहास चोरघडे यांचेपासून सुरू होतो असं जाणकारांचं मत आहे.

पहिल्या लघुकथासंग्रहाचा मानही त्यांना मिळाला आहे. त्यांनी “जडणघडण’ हे आत्मचरित्र लिहिले. “सुषमा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. हवन, यौवन, संस्कार, नागवेल हे त्याचे प्रसिद्ध कथासंग्रह. त्यांचे एकूण 12 कथासंग्रह प्रसिद्ध झाले. “साद’ हा त्यांचा शेवटचा कथासंग्रह. या थोर साहित्यिकाचे 1 डिसेंबर 1995 रोजी निधन झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)