सुपा: पारनेर तालुक्यातील वाघुंडे खुर्द शिवारात बेकायदा वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलिसांनी ताब्यात घेतला. यावेळी दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुपा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (दि. 8) नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील वाघुंडे खुर्द शिवारात सायंकाळी पाच वाजता दोन जण बेकायदा वाळू उपसा करीत असल्याचे आढळले. याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी जात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांसह ट्रॅक्टर (क्र. एमएच-16 बीवाय-0493) व ट्रॉली ताब्यात घेतली. अजित बाळासाहेब मगर (वय-24 वर्षे), बाळू बाबाजी मगर (वय 45, दोघे रा. वाघुंडे खुर्द, ता. पारनेर) यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान वाघुंडे खुर्द, वाघुंडे बुद्रुक, बाबुर्डी, रुईछत्रपती या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. मात्र शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आल्यानंतर वाळू तस्करांची धाबे दणाणले आहेत.