धोम जलाशयाचा वापर बैल धुण्यासाठी

दुर्घटनेची शक्‍यता : शेतकऱ्यांना आवर घालण्याची गरज
धनंजय घोडके

वाई  –
धोम जलाशयात घडणाऱ्या दुर्घटना पर्यटकांनाही नवीन नाहीत आणि स्थानिकांनाही नाही. आजवर धोम जलाशयात अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झालेला असताना येथील शेतकरी सध्या धोम जलाशयात खोलवर पाण्यात बैल धुण्यासाठी नेत आहेत. या प्रकारामुळे धरणातील गाळात पाय रुतून दुर्घटना घडण्याचीही शक्‍यता नाकारता येत नसल्याने संबंधित विभागाने शेतकऱ्यांना आवर घालून धोम धरणात बैल धुण्यास मज्जाव घालण्याची मागणी होत आहे.

धोम धरणाच्या उभारणीला पन्नास वर्षांचा कालावधी लोटला असला तरीही धोम धरणात ज्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून सरकारला जमिनी विनामोबदला दिल्या. तरीही आज मितीला या परिसरातील शेतकऱ्यांची परवड संपलेली नाही. समोर पाणी दिसत असताना धरणातील पाण्यावर या भागातील शेतकऱ्यांचा कसलाही अधिकार नाही. धोम, अभेपुरी परिसरातील शेतकरी आपल्या घरातील जनावरे धरणातील पाण्यावर घेवून येतात. जीव धोक्‍यात घालून जनावरे पाणी तर पाजतातच परंतु पोहोण्यासाठी त्याच पाण्यात घालतात, ही अतिशय गंभीर बाब असून धरणाच्या पाण्यात जनावरे धुणे, पोहोण्यास घालणे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोय परंतु जानावरांसह शेतकऱ्यांचा जीव पण धोक्‍यात घालत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धोम धरणात सध्या प्रचंड प्रमाणात गाळ साचलेला असल्याने धरणात पाणी कमी आणि चिखल जास्त अशी काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या तरी धरणाच्या पाण्यात उतरणे अथवा जनावरांना पोहोण्यासाठी उतरविणे अतिशय धोक्‍याचे आहे. धोम परिसरातील शेतकरी दररोज नित्यनियमाने धरणातील पाण्यावर जनावरे आणण्याची जणू प्रथाच पडली आहे. धोम पाटबंधारे खात्याचे मात्र या बाबींकडे साफ दुर्लक्ष आहे, त्यामुळे असाही धरणाच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

धोम धरणातून या भागातील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्कीम नेण्यात आलेल्या आहेत. त्यासुध्दा याच ठिकाणाहून गेल्या असल्याने गावातील स्कीममधून येणारे पाणी दूषित होत आहेच परंतु भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न या निमित्ताने पुढे आला आहे. अनेक वेळा या भागातील काही गावांमध्ये गॅस्ट्रोची लागण झालेल्या घटना घडल्या आहेत. धोम पाटबंधारे खात्याने या सर्व बाबींकडे गांभीर्याने पाहून त्वरित बंदोबस्त करावा व धरणातील पाण्यावर जे शेतकरी जनावरे आणून अपघातास निमंत्रण देत आहे, त्यांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येवून मार्ग काढावा.

गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे

धोम धरणातील पाण्यात सध्या चाळीस टक्के गाळ साचला असून साचलेल्या गाळामुळे धरणातील पाण्यात दरवर्षी एक तरी दुर्घटना झालेली आहे. असे अनेक वर्षांपासून अपघात झालेले आहेत. तरीही धोम पाटबंधारे खात्याला गाळ काढणीसाठी मुहूर्त मिळालेला नाही, किती जिवांच बलिदान दिल्यावर संबंधित खात्याला जाग येणार असा प्रश्‍न या परिसरातील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
-दत्तात्रय पवार

धरणाच्या सुरक्षेविषयी पाटबंधारे गंभीर नाही

सध्या धोम धरणावर आओ-जावो घर तुम्हारा अशी विचित्र परिस्थिती पहावयास मिळत आहे. धोम धरणावर पर्यटकांच्या मद्य पिण्याला कोणताही प्रतिबंध लावण्यात येत नसल्याने सर्व नियमांना तिलांजली वाहिल्याचे चित्र दुर्दैवाने पहावयास मिळत आहे. तरी धोम पाटबंधारे खात्याने धोम धरणाकडे गांभीर्याने पाहून धरणाची सुरक्षा कडक करावी अन्यथा एखादा अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
-अनिल मांढरे, अभेपुरी ग्रामस्थ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)