वॉशिंग्टन – अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे नागरीक पुन्हा आपल्या देशात परत घेण्यास पाकिस्तानने नकार दिल्यानंतर अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लागू केले आहेत. मात्र दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कायम राहतील असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. हे निर्बंध पाकिस्तानी नागरीकांना अमेरिकेत प्रवेश बंदी लागू करण्यापुरतेच सध्या मर्यादित असले तरी त्याची व्याप्ती पुढील काळात वाढवली जाऊ शकते असे अमेरिेकेच्या होमलॅंड सिक्युरिटी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानी नागरीकांवर अमेरिकेची व्हीसा बंदीही लागू केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकेत व्हीसा मुदत संपुन गेल्यानंतरही राहणारे नागरीक आणि अमेरिकेतून घालवून देण्यात आलेले नागरीक पुन्हा आपल्या देशात घेण्यास पाकिस्तानने नकार दिल्यानंतर अमेरिकेने ही कारवाई केली आहे. या महिन्यात अमेरिकेने सुमारे दहा देशांवर अशी कारवाई केली आहे. त्यात पाकिस्तान बरोबरच अफ्रिकेतील काही देशांचा समावेश आहे. या निर्बंधांमुळे पाकिस्तानी नागरीकांना शिक्षण किंवा व्यवसायाच्या निमीत्ताने अमेरिकेत जाणे जिकीरीचे होणार आहे. अमेरिकेने व्हीसा बंदी लागू केली तर त्याचा विपरीत परिणाम पाकिस्तानवर होऊ शकतो.
दरम्यान अमेरिकेच्या विदेश विभागाने पाकिस्तानवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या विषयाला फार गंभीर स्वरूप नसल्याचे भासवले आहे. हे निर्बंध सध्या केवळ इमिग्रेशनच्या संबंधात आहेत असे त्यांनी सुचित केले आहे. मात्र अमेरिकेच्या या कारवाई मुळे अनेक विषय पाकिस्तान साठी गंभीर होत जाणार आहेत असे पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी म्हटले आहे.