वॉशिंग्टन- इराणविरोधातील संबंध ताणलेले असताना अमेरिकेने मध्यपूर्वेमध्ये 1 हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. ओमानच्या आखातामध्ये तेलाच्या दोन टॅंकरवर झालेला हल्ला इराणनेच केला असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यानंतर इराणकडून अधिक हल्ले होण्याच्या शक्यतेने संरक्षणाच्या कारणावरून हे सैन्य मध्यपूर्वेत तैनात केल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पॅट्रीक शान्हान यांनी सांगितले.
अमेरिकेला इराणविरोधात युद्ध नको आहे. मात्र या भागामध्ये कार्यरत असलेल्या अमेरिकेच्या दलांच्या संरक्षणाची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय हितालाही जपणे आवश्यक आहे, असे शान्हान यांनी सांगितले.
ओमानच्या आखातामध्ये 13 जून रोजी दोन तेलवाहू टॅंकरवर हल्ले झाले होते. हे हल्ले इराणनेच केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.
इराणने हा आरोप त्वरित फेटाळला मात्र तेंव्हापासून मध्यपूर्वेमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे अमेरिकेने सौदी अरेबिया, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरतीमध्ये यापूर्वीच अतिरिक्त सुरक्षा दले तैनात केली आहेत. यामध्ये विमानवाहू नौका आणि लढाऊ विमानांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या भूमिकेचे समर्थन सौदी अरेबियाने केले होते, तर ब्रिटन, रशियाने इराणला पाठिंबा दर्शवला आहे.