अमेरिका-चीनला निर्यात वाढविण्याची भारतीय निर्यातदारांना संधी
नवी दिल्ली -अमेरिका आणि चीनदरम्यानचे व्यापारयुद्ध वाढले आहे. याचा फायदा भारताला होऊ शकतो असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. भारत अमेरिका आणि चीनलाही निर्यात वाढवू शकतो मात्र त्यासाठी भारताने वेगात उपाययोजना करण्याची गरज आहे.
भारतीय परकीय व्यापार संस्थेचे प्राध्यापक राकेश मोहन जोशी यांनी सांगितले की, चीन अमेरिकेला निर्यात करतो ती निर्यात भारत अमेरिकेला करू शकतो. त्याचबरोबर अमेरिका चीनला जी निर्यात करते ती निर्यात भारत चीनला करू शकतो. त्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स, सोयाबीन, तयार कपडे या क्षेत्रात निर्यात वाढवू शकतो.विशेषत: तयार कपड्यांच्या बाबतीत चीनची जागा भारत घेऊ शकतो कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कापड निर्मिती आणि तयार कपडे बनविण्याची क्षमता आहे.
त्याचबरोबर माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान व वाहन क्षेत्रातही भारत अमेरिकेला निर्यात करू शकतो. मात्र यासाठी वाणिज्य मंत्रालयाने उद्योजकांच्या संघटनाशी व निर्यातदारांशी चर्चा करून एक रूपरेषा तयार करण्याची गरज आहे. याबाबत बोलताना भारतीय निर्यातदारांच्या संघटनेचे अध्यक्ष गणेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यापासून भारताची अमेरिकेला आणि चीनला निर्यात वाढत आहे.आता होत असलेल्या घडामोडींमुळे ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला केलेल्या निर्यातीत 11.2 टक्क्यांची वाढ झाली. तर भारताने चीनला केलेल्या निर्यातीत 31.4 टक्क्यांची वाढ झाली. चीनसाठी अमेरिकेची बाजारपेठ काही प्रमाणात बंद झाल्यामुळे चीन भारतासोबत व्यापार बोलणी करण्यास उत्सुक आहे.
कृषी उत्पादनासाठी चीनने भारताकडे विचारणा केलेली आहे. त्यामुळे भारत अमेरिका आणि चीनबरोबर वेगवेगळे व्यापार करार करू शकतो. त्या संदर्भात बोलणे चालू आहे त्याला वेग देण्याची गरज आहे.अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या आयातीवरील शुल्क 10 टक्क्यांवरून 25 टक्के इतके केले आहे.