उरूळी देवाची कचरा डेपो बंद करणार?

राज्यमंत्री शिवतारे : शहरात 5 प्रक्रिया प्रकल्प सुरू करणारपुणे – शहरात अन्य पाच ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करून डिसेंबर-2019 मध्ये उरूळी देवाची येथील कचरा डेपो बंद करणार असल्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिले. मात्र कचरा डेपो बंद करण्यासंदर्भात कोणतेही आश्‍वासन प्रशासनाने दिले नसल्याचे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

उरूळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावातील कचरा डेपो बाधितांची बैठक महापालिकेत शिवतारे यांनी घेतली. या बैठकीला महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, गावांतील कृती समितीचे प्रमुख, ग्रामपंचायत पदाधिकारी, महापालिका आयुक्त राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत कचरा डेपोशिवाय समाविष्ट झालेल्या 11 गावांतील प्रलंबित प्रश्‍नांवरही चर्चा करण्यात आली.

-Ads-

फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावांचा महापालिका हद्दीमध्ये समावेश झाला आहे. येथील ग्रामस्थ मागील 23 वर्षांपासून कचरा डेपो समस्येने ग्रासले आहेत. तो बंद करण्यासंदर्भात अनेकदा आंदोलन झाले. अगदी मुख्यमंत्र्यांनीही याप्रकरणी मध्यस्थी करत स्वत: लक्ष घालून हा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, शनिवारी झालेल्या बैठकीत यावर डिसेंबर-2019 पर्यंतची मुदत दिली असून, तोपर्यंत महापालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, अशा सूचना करण्यात आल्याचे शिवतारे म्हणाले.

केशवनगर, लोहगाव, देवाची उरळी, सुखसागरनगर आणि खराडी येथे प्रत्येकी 100 टनाचे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची तयारी महापालिकेने केली आहे. तसेच रामटेकडी येथे 700 टन क्षमता प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले. या प्रकल्पाची उभारणी येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार असून, येथे 500 टन सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले. यामुळे सुमारे हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल, असेही आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केले.

उरूळी देवाची येथील जागा कचरा डेपोला देताना बाधितांच्या वारसांना नोकरी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यात 57 जणांचा समावेश आहे. त्यातील 40 जणांचा वारसा सिद्ध झाला आहे. त्यांना येत्या 10 सप्टेंबरपर्यंत महापालिका सेवेत घेण्यात येईल; उर्वरीत 17 जणांनी न्यायालयातून वारसहक्काची कागदपत्र आणून दिल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत त्यांना नेमणुका देण्याचे आश्‍वासनही आयुक्तांनी दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

देवाची उरूळी आणि फुरसुंगी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची योजना तयार करण्यात आली आहे. परंतू ही गावे पूर्वी महापालिकेच्या हद्दीबाहेर असल्याने दरडोई 90 लि. प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आल्याने दरडोई 150 लि. प्रमाणे पाणी पुरवठा करण्याची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाने एकत्रित येऊन तयार करावी, अशी सूचनाही केल्याचे शिवतारे म्हणाले.

प्रशासन म्हणते, “कचरा डेपो बंद होणार नाही’

डिसेंबर-2019 ला कचरा डेपो बंद होणार असे जरी शिवतारे यांनी सांगितले असले, तरी कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर आणखीही जो प्रक्रिया न होऊ शकणारा कचरा उरेल तो कचरा डम्पिंग ग्राऊंडवर डंप केला जाणार आहे. अर्थात त्याचे प्रमाण एकूण कचऱ्यापेक्षा खूपच कमी असेल. ही जागा महापालिकेचीच असल्यामुळे हा कचरा डेपो पूर्णपणे बंद केला जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

येवलेवाडी प्रकल्पाला विरोधच
येवलेवाडीच्या विकास आराखड्यात कचरा प्रकल्पाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्याला विरोध करणारे पत्र मी आधीच दिले आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. येवलेवाडीत आधीच कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. आणखी प्रकल्पासाठी आरक्षण नको, असेही या पत्रात म्हटल्याचे शिवतारे म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)