उरमोडी पात्र वारंवार कोरडं

नागरिकांना करावी लागतेयं पाण्यासाठी भटकंती

नागठाणे – सातारा तालुक्‍यातील बहुतांश गावांच्या पाणीपुरवठा योजना या उरमोडी नदीपात्रालगत आहेत. मात्र उरमोडी नदीपात्रातून शेती व पाणीपुरवठा योजनांच्या वाढत्या उपश्‍यामुळे व उरमोडी धरणातून नदीला पाणी सोडण्याच्या आवर्तनात असणाऱ्या मोठ्या फरकामुळे बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच नदीकाठची गावे, पाणीपुरवठा विहिरी कोरड्या होत असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

सातारा तालुक्‍याच्या पश्‍चिमेस परळी खोऱ्यातून वाहत असलेल्या उरमोडी नदीवर परळी येथे धरण बांधण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी या नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारेही बांधण्यात आले आहेत. या धरणामुळे व बंधाऱ्यांमुळे काही महिने वाहणारी ही नदी आता बारमाही वाहत आहे. या नदीच्या पाण्यावरच सातारा शहरासह तालुक्‍यातील अनेक गावाची पिण्याच्या पाण्याच्या उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. तसेच या नदीपात्रातून शेतीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असतो. यामुळे हा परिसर कायम बागायत म्हणून ओळखला जात असून अनेक गावांच्या ऐन उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली होती.

मात्र बदलत्या काळानुसार व वाढत्या लोकसंख्येमुळे या नदीपात्रातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. त्यामुळे येथील बंधारे लवकरच कोरडे ठणठणीत पडत आहेत. त्यातच धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनात मोठा फरक पडत आहे. त्यामुळे या नदीपात्रात असणाऱ्या अनेक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडत असल्याने ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच या परिसरातील जनतेवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून परिस्थिती अशीच राहिल्यास ऐन उन्हाळ्यात या नदीपात्रालगतच्या जनतेवर ‘पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here