उर्मिला मातोंडकरचा कॉंग्रेसप्रवेश

नवी दिल्ली – बॉलीवूडमधील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने आजअखेर कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने पक्षप्रवेश केला. कॉंग्रेसकडून उर्मिला उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात येण्याची शक्‍यता आहे.

लहानपणापासूनच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचे उर्मिलाने यावेळी सांगितले. कॉंग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे आपण पक्षप्रवेश केल्याचेही तिने सांगितले. हा प्रवेश केवळ निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेला नाही, असेही तिने स्पष्ट केले. यावेळी कॉंग्रेस प्रवक्‍ते रणदिप सुरजेवाला उपस्थित होते.

उर्मिला मातोंडकर म्हणाली, गेल्या पाच वर्षांत देशात हुकुमशाही सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले असून नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक उदाहरणे देण्यासारखी आहेत. त्यामुळेच आज मी पक्षात प्रवेश करत आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत कॉंग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावित देशाला पारतत्र्यातून मुक्‍त केले. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मी लढा देणार आहे, असे तिने सांगितले.

उत्तर मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कॉंग्रेस शेट्टींविरोधात एका तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार कॉंग्रेस करत आहे. याआधी कॉंग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावे चर्चेत होती.

दरम्यान, याआधी उत्तर मुंबई उमेदवारीसाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा पक्ष विचार करत असल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले होते. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली होती. त्यानंतरच उर्मिला मातोंडकर यांच्या कॉंग्रेस पक्षप्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)