पुणे – लहान वयोगटातील आणि 95 सेंटीमीटर उंची असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने महापालिका “अर्बन-95′ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध रस्ते, उद्याने, पालिकेचे विविध प्रकल्प या ठिकाणी मुलांसाठी पूरक बाबी, वस्तू, खेळणी आणि आकर्षक वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे.
यासाठी शुक्रवारी महापालिकेत अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली. या बैठकीस सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, उपायुक्त सुभाष इंदलकर, उपायुक्त संजय रांजणे, उद्यान प्रमुख अशोक घोरपडे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, कार्यकारी अभियंता दिनकर गोंजारे, प्रशासन अधिकारी शुभांगी चव्हाण, अभिजीत डोंबे, बर्नार्ड वन लिअर फाऊंडेशन प्रतिनिधी रुषदा मजीद, रजत उचिल, अमीर पटेल उपस्थित होते.
या उपक्रमासाठी आवश्यक मान्यतेसह अंदाजपत्रकीय तरतुदी, “सीएसआर’अंतर्गत सहाय्य आणि या सर्व बाबींना अनुसरून विविध संबंधित खात्यांनी करावयाची कामे, याबाबत कार्यालयीन परिपत्रकांद्वारे विविध खात्यांना सूचित केले जातील, अशी माहिती अगरवाल यांनी यावेळी दिली.
यावेळी मजीद यांनी “अर्बन-95′ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकसित प्रकल्पांविषयी माहिती दिली. तर रजत उचिल आणि अमीर पटेल यांनी प्रकल्पाविषयक पायाभूत रचना, अभ्यास, प्रत्यक्ष सहभागावर सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक विक्रांत कापसे यांनी, तर सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन सचिन उपाध्ये यांनी केले.
नेमके काय करणार?
शहरातील रस्ते, उद्याने, विविध प्रकल्पात यांसह ज्या ज्या ठिकाणी “अर्बन-95′ अभियानाअंतर्गत सुशोभिकरण शक्य आहे, तेथे लहान मुलांच्या विकासासाठी टाकाऊ वस्तूंपासून जंगल जिम, खेळ, कलात्मक कट्टे, कोपरे, झाडांना कुंपणे, विविध रंगसंगती, कलात्मक खेळांच्या रचना, ओपन जिम, विविध रंगसंगती अशा विविध प्रकारच्या गोष्टी केल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या संबंधित खात्यांमार्फत नियोजन करून उपक्रम राबविले जाणार आहेत.