जरा याद करो कुर्बानी…!

संग्रहित छायाचित्र...

मागच्या गुरुवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला जेव्हा संपूर्ण जग ‘प्रेमाचा’ दिवस साजरा करण्यामध्ये व्यस्त होते त्याच वेळी भारताच्या नंदनवनामध्ये मात्र काही क्रूर शक्तींनी रक्ताचा सडा पाडला. या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 40 शूरवीर जवान धारातीर्थी पडले. दहशतवादाची जन्म आणि कर्मभूमी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

भारतावर आजवर अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी जबाबदार असलेल्या मसूद अझहरने पुन्हा एकदा भारताच्या पाठीवर वार करत आपला नामर्दपणा सिद्ध केला. या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात भारतीय जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, हल्ल्यानंतर सतत भारताच्या कुरापती काढण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या पाकिस्तानला आता पाकिस्तानच्याच भाषेत उत्तर द्यायलाच हवे अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये धगधगत आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांवर जर अशाप्रकारचे हल्ले होत असतील तर समाजामध्ये संतापाची लाट पसरणे साहजिकच आहे. मात्र जवानांवर केवळ हल्ले झाल्यानंतरच काही दिवसांसाठी राजकारणी, मीडिया आणि सामान्य नागरिकांमधून व्यक्त केल्या जाणाऱ्या प्रेमाला कारगिल युद्धामध्ये देशाचे रक्षण करताना आपला एक पाय गमावलेले सेवानिवृत्त मेजर डी पी सिंह यांनी वाचा फोडली आहे. सेवानिवृत्त तथा शहीद जवानांना सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या वागणुकीची कैफियत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली असून जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांची कैफियत वाचल्यानंतर आपली मान देखील शरमेने झुकल्याशिवाय राहणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशासाठी कारगिल युद्धामध्ये आपला एक पाय गमावलेले निवृत्त मेजर डी पी सिंह त्यांच्या पोस्टमध्ये सांगतात की, “कारगिल युद्धामध्ये लढताना दिव्यांग झाल्यानंतर मला माझे योग्य निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी न्यायालयामध्ये अनेक वर्ष संघर्ष करावा लागला! मला सिद्ध करावे लागले की मला आलेले दिव्यांगपण हे युद्धामध्ये झालेल्या इजेमधून उद्भवले आहे.” आपल्या हक्काचे निवृत्तीवेतन मिळवताना आपल्या वाट्याला आलेल्या यातना इतर जवानांच्या अथवा त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी काम करणाऱ्या सिंह यांनी अशा अनेक घटनांवर आपल्या पोस्टद्वारे प्रकाश टाकला आहे. जर एखाद्या धारातीर्थी पडलेल्या जवानाचे पार्थिव सापडले नसेल तर अशावेळी मानधनाची मागणी करणाऱ्या जवानांच्या विधवांनाच कशा प्रकारे आपल्या पतीचे पार्थिव शरीर उपलब्ध करून द्यावे असे आदेश दिले जातात याबाबतचे हृदयद्रावक वर्णन त्यांनी केले आहे. सिंह यांनी मांडलेले हे वास्तव प्रत्येक भाषणामधून सैनिकांच्या नावाचा उदोउदो करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या मनांमध्ये खरंच सैनिकांप्रती आत्मीयता आहे काय? असा प्रश्‍न उपस्थित करते. या निमित्ताने आपण देखील स्वतःला विचारायला हवे की सैनिक धारातीर्थी पडल्यावर केवळ मेणबत्ती लावण्यापुरती आत्मीयता दाखवायची की आपल्या सुरक्षिततेसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्याच्या हक्कांसाठी लढा द्यायचा?

– प्रशांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)