‘महाडीबीटी’ पोर्टलवरील माहिती अद्ययावत करा

शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षण विभागाचे आवाहन

पुणे – राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाइन पद्धतीने “महाडीबीटी’ पोर्टलवर अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालय, संस्था यांनी पोर्टलवर आपली माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे. याबाबतचे आदेश उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी बजाविले आहेत.

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत शासनाच्या 14 शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी पोर्टलवर महाविद्यालयाचे नाव, पत्ता, अभ्यासक्रम यांची माहिती अद्ययावत ठेवणे गरजचे आहे. सद्यस्थितीत पोर्टलवर महाविद्यालयांची मागील वर्षांची माहिती दर्शविण्यात आल्याचे दिसून येत आहे. माहितीतील तफावर दूर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मान्यता मिळालेल्या नवीन अभ्यासक्रमांची पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. महाविद्यालयांना त्यांच्या प्राचार्यांच्या लॉग-इनमधून माहितीत सुधारणा करता येणार आहे.

पोर्टलवर नोंदणी झालेल्या महाविद्यालयांची माहिती घेऊन त्यांची नावे समाविष्ट करण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी. विद्यापीठांचे कुलसचिव, शासकीय व अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, असे आदेश माने यांनी राज्यातील सर्व विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना दिले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)