युतीवर अनिश्तिततेचे सावट

पिंपरी, भोसरी, चिंचवडमध्ये सेना-भाजपाची जोरदार तयारी

आयत्यावेळी युती तुटण्याची शक्‍यता

युतीमधील शिवसेना आणि भाजपाकडे प्रचंड प्रमाणात असलेली इच्छुकांची संख्या आणि जागा वाटपात निर्माण होणारे संभाव्य प्रश्‍न यामुळे दोन्ही पक्ष आयत्यावेळी स्वतंत्र लढण्याचीच शक्‍यता आहे. बंडखोरी रोखण्यासाठी राज्य पातळीवरूनच स्वतंत्र लढण्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता भाजपातील सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच दोन्ही पक्षांकडून विजयाच्या शक्‍यतेची चाचपणी, वेगळे लढल्यास बदलणारी समीकरणे या सर्वच बाबींचा अभ्यास करुन युती तुटण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. 

पिंपरी – राज्यपातळीवरील सेना-भाजपाचे नेते युती होणार असल्याचा ठामपणे दावा करीत आहेत. परंतु स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे नेते युतीबाबत सावध भूमिकेत आहेत. गतवेळी प्रमाणेच आयत्यावेळी युती तुटण्याची शक्‍यता व्यक्‍तकरत सेना आणि भाजपाच्या इच्छुकांनी तीनही मतदारसंघात विधानसभेची तयारी केल्याने राजकीय वातवरण ढवळून निघू लागले आहे. दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या मोर्चेबांधणीमुळे युतीवर अनिश्‍चिततेचे सावट असल्याची चर्चा शहर पातळीवर रंगली आहे.

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी चालविली आहे. शिवसेना, भाजपा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे शहरातील प्रमुख पक्ष असले तरी वंचित आघाडी हा पक्षदेखील स्पर्धेत उतरला आहे. सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीतील प्रमुख चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तर हेच पक्ष 2009 साली युती आणि आघाडी करून लढले होते. तत्कालीन जागावाटप आणि सध्याचे आमदार यामधील चित्र वेगळे असल्यामुळे युती झाल्यास कोणता मतदारसंघ कोणाकडे याचा ठावठिकाणा कोणालाच लागत नसल्यामुळे सर्वांनीच तयारी चालविली आहे.

2009 च्या जागा वाटपानुसार शहरातील चिंचवड आणि भोसरी हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे तर पिंपरी हा मतदारसंघ भाजपाकडे होता. मात्र 2014 साली स्वतंत्र लढल्यामुळे भोसरीतून अपक्ष आमदार महेश लांडगे, चिंचवडमधून भाजपाचे लक्ष्मण जगताप तर पिंपरीतून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे विजयी झाले होते. तत्कालीन भाजपासोबतच्या जागा वाटपात पिंपरी हा मतदारसंघ रिपाईला (आठवले गट) सोडण्यात आला होता. तर भोसरीतून अपक्ष विजयी ठरलेल्या लांडगे यांनी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले आहे. त्यामुळे आता युती झाल्यास 2009 चा जागावाटपाचा “फॉर्म्युला’ कायम राहणार की नव्याने जागा वाटप होणार हा खरा प्रश्‍न आहे. 2009 साली जागा वाटपात शिवसेनेला शहरातील दोन जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे तसाच “फॉर्म्युला’ असावा, अशी शिवसेनेची मागणी असणे स्वाभाविक आहे.

सध्या भाजपा शहरात स्वतःला जास्त प्रबळ मानत असल्याने दोन जागांवर हक्‍क सांगू शकते. परंतु वास्तविकता पाहता 2014च्या मोदी लाटेतही भाजपाला तीनपैकी केवळ एकच जागा जिंकता आली होती, हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे शहराबाबत काय “फॉर्म्युला’ ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जुन्या वाटपानुसार जागा राहिल्यास शहरातील राजकीय चित्र बदलणार आहे. तर नव्याने जागा वाटप झाल्यास शहरातील दोन मतदारसंघावर शिवसेना हक्क सांगण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

त्यातच युतीचे वारे असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. तीनही मतदारसंघात असलेल्या दोन्ही पक्षांतील इच्छुकांची संख्या पाहता पक्षश्रेष्ठींसमोरच प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. युती झाल्यास बंडखोरी निश्‍चित मानली जात आहे. पक्षाची उमेदवार मिळाली तर ठीक, अन्यथा इतर पक्षातून किंवा अपक्षही लढू अशी तयारी बहुतांश इच्छुकांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीला अद्याप दोन ते तीन महिन्यांचा कालावधी बाकी असतानाही आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)