भाष्य – गैरसमजातील गणित

डॉ. अ. ल. देशमुख

इयत्ता दुसरीसाठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये गणित विषयामध्ये संख्यावाचनासाठी एक नवी पद्धत मांडलेली आहे. ती मांडत असताना कुठेही संख्यावाचनाची जुनी पद्धत बंद करा किंवा ती गुंतागुंतीची आहे किंवा ती चुकीची आहे किंवा ती विद्यार्थ्यांना त्रासदायक आहे असे म्हटलेले नाही. जोडाक्षरांमुळे किंवा अन्य कारणांमुळे लहान वयोगटातील मुलांना या संख्यांचे आकलन करण्यास येणारे अडथळे दूर करणे आणि गणित सोपे करणे हा यामागचा हेतू आहे. वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून गणित शिकणे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून आनंददायी अनुभव आहे. त्यामुळे नवीन पद्धत विद्यार्थ्यांना कठीण जाईल असे वाटत नाही.

महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीने प्रकाशित केलेले इयत्ता दुसरीचे गणिताचे पाठ्यपुस्तक प्रकाशित झाले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये संख्यावाचन या संदर्भामध्ये एक नवी पद्धत मांडलेली आहे. मांडलेली नवी पद्धत, अभ्यासक्रम मंडळाचा दृष्टीकोन, अभ्यासक्रम मंडळाचा विचार, भूमिका न समजून घेता व पाठ्यपुस्तक न वाचता समाजातल्या विविध स्तरातल्या तज्ज्ञ म्हणून समजणाऱ्या व्यक्तींनी व प्रसारमाध्यमांनी या संदर्भामध्ये अनेक वादविवाद घडवून आणले, सुरू केले आणि प्रकाशितही झाले. एवढ्यावर हा विषय थांबला नाही तर या विषयामध्ये मराठी साहित्य परिषद यांनीही उडी घेऊन समाजामध्ये संभ्रम निर्माण कऱण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला. महाराष्ट्र शासनाच्या विधानसभेतही यावर चर्चा झाली. त्यामुळे नेमकी समस्या काय आहे हे समजून घेणे आवश्‍यक आहे.
गणित अध्यापन मंडळाने इयत्ता दुसरीच्या पुस्तकामध्ये संख्यावाचनासाठी जी नवीन पद्धत सुचवलेली आहे ती पुढीलप्रमाणे.
सत्तर एक = 71, सत्तर दोन = 72 , सत्तर तीन = 73, सत्तर चार = 74, सत्तर पाच = 75. अशा प्रकारे सर्वच आकड्यांचे उच्चारण पूर्वीप्रमाणे पंच्याहत्तर, सदुसष्ठ, एकोणऐंशी असे न करता नव्या पद्धतीने करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. संख्यावाचनासाठी ही पद्धत सुचवण्यामागे अभ्यासक्रम मंडळाने पुढील कारणे दिलेली आहेत.

1. इयत्ता दुसरीचा वयोगट लहान असल्यामुळे त्यांना जोडाक्षरातील संख्या वाचणे थोडेसे कठीण जाते. नव्या पद्धतीमुळे हा अडसर दूर करणे.

2. गणितामध्ये नावीन्यता आणून गणिताची भीती कमी करण्यास सावध करणे.

3. विद्यार्थ्यांना 2 अंकी संख्येतील दशक आणि एकक यांचं आकलन होऊन दोन अंकी संख्येस्वरूप प्रभावी पद्धतीने समजणे.

वरील तीन उद्दिष्टे साध्य करीत असताना अभ्यासक्रम मंडळाने कुठेही संख्यावाचनाची जुनी पद्धत बंद करा किंवा ती गुंतागुंतीची आहे किंवा ती चुकीची आहे किंवा ती विद्यार्थ्यांना त्रासदायक आहे असे म्हटलेले नव्हते अथवा नाही. ज्या विद्यार्थ्यांना जोडाक्षरे उत्तम वाचता येतात त्यांनी जुन्याच पद्धतीने वाचन केले तरीही चालेल असा स्वच्छ विचार पाठ्यपुस्तकातून मांडलेला आहे. एक उदाहरण पाठ्यपुस्तकात दिलेले आहे ते असे ः 47 ही संख्या चारावर सात – सत्तेचाळीस या प्रमाणे वाचावी किंवा चाळीस सात बरोबर 47 या पद्धतीने वाचावी, असे सुचविले आहे.

इयत्ता दुसरीचा वयोगट हा सात वर्षांचा आहे. मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार वय वर्षे12 पर्यंत मुलांच्या मेंदूची विकासावस्था मोठ्या प्रमाणात असते. त्यांची आकलनशक्ती जास्त असते. त्यांना कितीही नव्या गोष्टी दिल्या तरी त्या ग्रहण करण्याची त्यांच्या मेंदूची क्षमता असते. मानसशास्त्राचा हा सिद्धांत गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. या सिद्धांतानुसार विचार केल्यास नवीन एकच पद्धत सुचवलेली आहे. त्याऐवजी दोन तीन सुचवल्या तरीही विद्यार्थ्यांची ग्रहण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे यावर वाद करण्याची आवश्‍यकता नाही.

वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून गणित शिकणे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून आनंददायी अनुभव आहे. त्यामुळे संख्यावाचनासाठी सुचवलेली नवीन पद्धत विद्यार्थ्यांना कठीण जाईल असे वाटत नाही. ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांचे मत काय आहे हे कुणीही विचारात न घेता ज्येष्ठ, अनुभवी, तज्ज्ञ मंडळी नकारात्मक भूमिका मांडत आहेत ते योग्य नाही. ज्याला हा विचार चुकीचा वाटतोय अशा व्यक्तींनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना काय वाटतंय याचे संशोधन करायला हवे. यानंतर ती पद्धत अयोग्य किंवा चुकीची आहे असे मत मांडले पाहिजे. मराठी लोकांनी यामध्ये पडण्याचे काहीही कारण नाही. त्यांना जर मराठीचा पुळका असेल तर इयत्ता दहावीच्या यावर्षीच्या निकालात 22 टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत त्याचा विचार मराठी लोकांनी करावा. मराठी मातृभाषा असलेल्या महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यिकांची रेलचेल असताना महाराष्ट्रातील 22 टक्के विद्यार्थी मराठीत नापास होतात ते आपल्याला भूषणावह आहे का याचा विचार मराठी अभ्यासकांनी करावा. विनाकारण गणितासारख्या विषयामध्ये लक्ष घालून आपलं हसू करून घेऊ नये.

महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये तज्ज्ञांची समिती नेमून हे अयोग्य आहे की योग्य आहे याची शहानिशा केली जाईल हा विचार मांडलेला आहे. काही राजकारण्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भात ऐकिव माहितीवर तारे तोडलेले आहेत. ते ही कितपत योग्य आहे याचाही विचार समाजातील जाणत्या लोकांनी केला पाहिजे. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाने गणित अभ्यासक्रम मंडळामागे खंबीरपणे उभे राहून हे योग्य कसे आहे हे समाजाला समजून सांगितले पाहिजे. ही शासनाची जबाबदारी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here