संयुक्‍त पुरोगामी आघाडीची घोषणा 

-कॉंग्रेस 24, तर राष्ट्रवादी 20 जागा लढविणार 
– महाआघाडीतील 56 पक्षांचा “छप्पन इंच’च्या छातीसोबत सामना 
मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप, रिपाइंमधील कवाडे, गवई गटासह अनेक गट आणि संघटना असे एकूण 56 पक्ष, संघटनांची महाआघाडी आहे. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीतील या 56 घटकपक्षांचा “छप्पन इंच’च्या छातीसोबत सामना रंगणार आहे, अशी घोषणा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित संयुक्‍त पुरोगामी लोकशाही आघाडीने आज केली. जे आमच्या आघाडीत आले नाहीत ते भाजपाची “बी-टीम’ असल्याची टीकाही अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता केली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित संपुआची घोषणा संयुक्‍त पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, बविआचे हितेंद्र ठाकूर, शेकापचे जयंत पाटील, रिपाइं नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, युवा स्वाभिमानचे रवि राणा आदी घटकपक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित संयुक्‍त पुरोगामी लोकशाही आघाडी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक एकत्र लढणार आहेत, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

भाजपा आणि शिवसेनेचे सरकार उलथवून टाकण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांची ही महाआघाडी उभारण्यात आल्याचे सांगून अशोक चव्हाण म्हणाले, कॉंग्रेस 26, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 22 जागा लढविणार आहे.कॉंग्रेस आपल्या कोट्यातून 2 जागा मित्रपक्षांना देणार आहे. त्यातील पालघरची जागा बविआला, तर आणखीन एक जागा राजू शेट्‌टींच्या स्वाभिमानीला सोडण्यात येईल.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हातकणंगलेची एक जागा स्वाभिमानीला, तर एक जागा रवि राणांच्या युवा स्वाभिमानला सोडणार आहे. सांगलीतील जागेबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॉंग्रेसच्या उर्वरित सहा जागांबाबत पक्षाध्यक्ष राहुल गांधी निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. या संयुक्‍त पत्रकारपरिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मात्र अनुपस्थित होते.

ती भाजपाची “बी टीम’-अजित पवार 
महाआघाडी करताना सहभागी होणा-या मित्रपक्षांना आम्ही 10 जागा सोडण्याची तयारी ठेवली होती असे सांगून अजित पवार म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने मिळून 38 जागा लढविण्याचीही तयारी केली होती. काही मित्रपक्षांना 6 जागा सोडण्याचीही आमची तयारी होती. पण त्यांना आघाडी करायचीच नव्हती.भाजपालाच मदत व्हावी म्हणून चर्चेचे गु-हाळ त्यांनी चालविले होते काय अशीच शंका आम्हाला येते आहे. जे पक्ष आमच्या आघाडीत आले नाहीत ते भाजपाची “बी टीम’ असल्याची टीकाही त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता केली.

“ते’ संभाषण खासगी 
अशोक चव्हाण यांचे कथित संभाषण असलेली एक टेप व्हायरल झाली आहे. त्याबाबत विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले, नेमके कोणते संभाषण व्हायरल झाले ते मी ऐकले नाही. पण मी चंद्रपूरमधील कार्यकर्त्यांशी बोललो होतो. ते प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ता यांच्यातील पूर्णपणे खासगी संभाषण आहे.त्यांचे स्थानिक प्रश्न आहेत. ते सोडविण्याचे आश्वासन मी त्यांना दिले. शेवटी आम्हाला पण खासगी बोलायचा अधिकार आहे ना? असाही सवाल त्यांनी केला. लोकसभेची निवडणूक लढायला मी तयार आहे.मात्र राजीव सातव यांनी निवडणूक लढवायला नकार दिल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

जागा वाटप… 
कॉंग्रेस 24, राष्ट्रवादी कॉंग्रेस 20, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2, बहुजन विकास आघाडी 1, युवा स्वाभिमान पक्ष 1 जागा लढवणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)