कोलंबो: श्रीलंकेत सध्या मुस्लिम अल्पसंख्यांविरुद्ध दंगली सुरू झाल्या आहेत. श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेले बॉम्बस्फोट इस्लामी अतिरेकी संघटनांनी घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्याच्याविरुद्धच्या प्रतिक्रियेत या दंगली सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या नागरिकांनी धार्मिक तेढ निर्माण करू नये, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे विशेष सल्लागार ऍडामा डेंग व कारेन स्मिथ यांनी केले आहे.
श्रीलंकेत एखाद्या विशिष्ट समाजाचे प्राबल्य नाही. तेथे वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात आहेत. असे असताना एखाद्या जातीला लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले चढवणे योग्य नाही. श्रीलंकेच्या सरकारने विरोधी पक्षांसह मिळून हा जातीय द्वेष मिटवण्याची गरज आहे, असेही डेंग आणि स्मिथ यांनी म्हटले आहे. आठ साखळी बॉम्बस्फोटांत सहभागी असलेल्या स्थानिक नॅशनल तौहिद जमातसह जमाते मिल्लते इब्राहिम आणि विलायत अस सेयलानी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.