विरोधकांची हटवादी भूमिका – अरुण जेटली

प. बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान येथील शेतकऱ्यांना मदतीचा लाभ नाही

नवी दिल्ली -केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी वार्षिक 75 हजार कोटी रुपयांची मदतीची योजना जाहीर केली आहे. त्यातील काही शेतकऱ्यांना मदतीचा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे. मात्र कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची राजवट असलेल्या अनेक राज्यात या शेतकऱ्यांना ते पात्र असूनही मदतीचा हा पहिला हप्ता मिळू शकलेला नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे.

या राज्यातील सरकारच्या संकुचित दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही, असा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होती. त्यासाठी पूर्ण वर्षाकरिता 75 हजार कोटी रुपयांची तरतूदही केली होती. केंद्र सरकारने लगेच राज्य सरकार संबंधित शेतकऱ्यांची यादी पाठविण्यास सांगितले होते. त्यानुसार पाच एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांची यादी राज्याकडून केंद्र सरकारने पाठविणे अपेक्षित होते. त्या आधारावर केंद्र सरकार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ही रक्‍कम भरणार होते. मात्र प. बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यातील शेतकऱ्यांची यादी संबंधित राज्य सरकारनी पाठविलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारला ही मदत या राज्यातील शेतकऱ्यांना देता आली नाही, असे जेटली यांनी सांगितले.

अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकारने पाच एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत जाहीर केले होती. ही रक्कम 3 हप्त्यात दिली जाणार आहे. यामुळे देशातील 12 कोटी छोट्या शेतकऱ्यांना मदत होणे अपेक्षित आहे.

मात्र विरोधी पक्षांच्या सरकारने या योजनेत राजकारण आणले. त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित व्हावे लागले. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कर्नाटक सरकारने तर फक्त सतरा शेतकऱ्यांची यादी पाठविली आहे. या वर्षात यासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे निवडणुकीअगोदर देशभरातील शेतकऱ्यांना किमान दोन हप्ते मिळण्याची शक्‍यता आहे. 7 मार्चपर्यंत देशातील 2 कोटी 18 लाख शेतकऱ्यांना 4366 कोटी रुपये त्याच्या खात्यात पाठविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथे 24 फेब्रुवारी रोजी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)