अंडरपासमध्ये पुनर्वसनाचे तोंडी नको, लेखी आश्‍वासन द्या

बाधितांची मागणी : स्वारगेट येथील मेट्रोच्या बाधितांचा प्रश्‍न कायम

पुणे – स्वारगेट येथील जेधे चौकात मेट्रो स्थानकामुळे बाधित झालेल्या स्टॉलधारकांना मेट्रोच्या अंडरपासमध्ये गाळे बांधून देणे किंवा स्थानकाच्या आऊटगेटच्या परिसरातील रिकाम्या जागेत गाळे बांधून देण्याचे महापालिका प्रशासनाने तोंडी दिलेले आश्‍वासन लेखी द्यावे, अशी मागणी “शहीद भगतसिंग मिनी मार्केट’ या स्टॉलधारकांच्या संघटनेने केली आहे.

मुंबईत रेल्वेस्थानक परिसरात अशाप्रकारे अंडरपास गाळे आहेत. त्याच धर्तीवर हे गाळे बांधून देण्याचे आश्‍वासन या स्टॉलधारकांना देण्यात आले आहे.संघटनेचे अध्यक्ष रमेश रावणे यांनी यासंदर्भात महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना शनिवारी निवेदन दिले. तसेच या आश्‍वासनाची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने 10 जून 2015 रोजी जेधे चौकालगत गेल्या चार दशकांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना 10 जून रोजी तेथून हलवले. हे सर्व स्टॉल अधिकृत असतानाही महापालिकेने हे स्टॉल काढून टाकले. याबद्दल व्यावसायिकांनी आवाज उठविल्यानंतर अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी व्यावसायिकांची बैठक घेउन याच ठिकाणी पक्‍क्‍या स्वरूपाचे गाळे बांधून देण्यात येतील असे आश्‍वासन दिले होते. महापालिकेने त्यादृष्टीने प्रक्रियाही सुरू केली होती. दरम्यान मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने गाळ्यांचे काम थांबविण्यात आले. आज याच ठिकाणी मेट्रो स्नाथकाचे कामही सुरू करण्यात आले आहे. परंतू या चार वर्षात व्यवसाय बंद पडल्याने व्यावसायिक बेरोजगार आणि कर्जबाजारी झाले आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे.

सध्या या स्टॉलधारकांचे पाटील प्लाझासमोरील पदपथावर तसेच सणस ग्राऊंडशेजारी पुनर्वसन करण्यात आले आहे. ते तात्पुरते असून मेट्रो स्थानकाचे काम झाल्यानंतर या स्टॉलधारकांना स्थानकामध्येच गाळे बांधून देण्यात येतील, असे आश्‍वासन जगताप यांनी दिल्याने स्टॉलधारकांनी पुनर्वसनाला विरोध केला नाही. तसेच महापालिका ज्या ठिकाणी सांगेल तेथे व्यवसाय करण्याची तयारी दाखविली आहे. परंतू “महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी या स्थानकामध्ये शॉपिंग मॉल, कार्यालये होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे स्टॉलधारकांच्या मनात धास्ती बसली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)