तंत्रज्ञानातील अद्ययावता, समाजशास्त्र समजून घ्या

एअर मार्शल अजित भोसले यांचा सल्ला : एनडीएच्या 136 व्या तुकडीचा पदवीप्रदान समारंभ

पुणे : ‘लष्करात नव्याने दाखल होणाऱ्या पिढीने तंत्रज्ञान आणि समाजशास्त्र या एकमेकांना समांतर आहे. हे व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. काश्‍मीरसारख्या प्रदेशातील तणावाची स्थिती हाताळताना काश्‍मीरीयत समजून घेणे हे जसे समाजशास्त्राचा भाग आहे, त्याचप्रमाणे बालाकोटमधील एअर स्ट्राइक ही तंत्रज्ञानातील अद्ययावता आहे. तुम्ही या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाही. त्यामुळेच भावी लष्करी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानातील अद्ययावता आणि समाजशास्त्राची सखोलता हे दोन्ही गोष्टी आत्मसात करणे आवश्‍यक आहे, असे मत एअर मार्शल अजित भोसले यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएच्या 136 व्या तुकडीचा पदवीप्रदान समारंभ बुधवारी पार पडला. यावेळी प्रबोधिनीतील विविध शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एअरमार्शल भोसले यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. याप्रसंगी प्रबोधिनीचे प्रमुख एअरमार्शल आय.पी. विपीन, प्राध्यापक ओमप्रकाश शुक्‍ला उपस्थित होते. प्रबोधिनीतून यंदा 290 विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. यामध्ये कला शाखेतील 82, विज्ञान शाखेचे 55, संगणक विज्ञान शाखेचे 114, बी.टेक अभ्यासक्रमाचे प्रमाण पत्र मिळविणारे 32 आणि सात मित्रराष्ट्रांचे विद्यार्थी सहभागी आहेत. प्रबोधिनीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलातर्फे देण्यात येणारी सिल्व्हर ट्रॉफी अनुक्रमे खिलानंद साहू, के. एस. चौहान आणि आशिषकुमार यांना प्रदान करण्यात आली.

एअरमार्शल भोसले म्हणाले, सध्याच्या काळात युद्धाच्या पद्धती बदलल्या आहेत. एकाच वेळी दोन विभिन्न परिस्थितीत लष्करी अधिकारी, जवान यांना शत्रूंचा सामना करावा लागत आहे. एकीकडे तुम्हाला घनदाट जंगल, पर्वतरांगांमध्ये जावून दहशवाद्यांचा शोध घ्यावा लागतो, तर दुसरीकडे जगाच्या एखाद्या कोपऱ्यात बसून सायबर, अवकाश तंत्रज्ञानाद्वारे देशावर हल्ला करणाऱ्या शत्रूंशी दोन हात करावे लागतात. या दोन्ही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असायला हवे. त्याचबरोबर ज्या प्रदेशात आपण काम करणार आहे त्या प्रदेशाबाबतची माहिती, तेथील समाजजीवन यांचाही आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळेच तंत्रज्ञान आणि समाजशास्त्र हे प्रत्येक लष्करी अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणाचा एक अविभाज्य भाग आहे.

मी मूळचा लखनऊ येथील आहे. माझ्यावर लहानपणापासूनच वडिलांचा लष्करातील शिस्तबद्ध जीवनशैलीचा मोठा प्रभाव होता. तेव्हापासूनच माझी लष्करात रुजू व्हायची प्रखर इच्छा होती. त्यामुळे माझ्या वडिलांना इयत्ता सहावीनंतरच मला बंगळूर सैनिकी शाळेत दाखल केले. बारावीनंतरच प्रवेश परीक्षा देऊन मी “एनडीए’मध्ये आलो. माझे वडील सुभेदार विजयकुमार हे 27 राजपूत बटालियनमध्ये सेवेत आहेत. त्याच बटालिटनमध्ये मला अधिकारी म्हणून रुजू व्हायचे आहे,”
– एस. के. चौहान, नौदल चषक विजेता


मी मूळचा छत्तीसगढ येथील आहे. माझ्या वडिलांनी मला सैनिकी शाळेत दाखल केले. त्यामुळे मला लष्करात रुजू होण्याची प्रेरणा मिळाली. “एनडीए’तील प्रत्येक दिवस स्मरणात राहणार असाच आहे. येथील खडतर प्रशिक्षण, अभ्यासक्रम हा पूर्ण विचारपूर्वक तयार केला आहे. संस्थेतून पदवी प्राप्त करताना आनंद आणि अभिमान वाटत आहे.
– खिलानंद साहू, लष्कर चषक विजेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)