नेतृत्वाचा पेच निर्माण झालेल्या कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता 

गांधी कुटूंबमुक्त पक्षाच्या भवितव्याबाबत कॉंग्रेसजनांना भेडसावतेय चिंता 
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने त्या पक्षात नेतृत्वाचा पेच निर्माण झाला आहे. त्यातून पक्षात अस्वस्थता निर्माण झाली असून अनेक कॉंग्रेसजन राहुल यांनी मन बदलावे असे साकडे घालत आहेत. नेतृत्वबदलाच्या माध्यमातून गांधी कुटूंबाबाहेरील नेत्याकडे धुरा सोपवण्याबाबत पक्षाची चाचपणी सुरू आहे. मात्र, गांधी कुटूंबमुक्त पक्षाचे भवितव्य कसे असेल, याची चिंता कॉंग्रेसजनांना भेडसावू लागली आहे.

सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्या धक्‍क्‍यातून सावरत नाहीत; तोच राहुल यांच्या निर्णयाने कॉंग्रेसजनांना दुसरा हादरा बसला. एकीकडे पुन्हा उभारी घेण्यासाठी कॉंग्रेसला झगडावे लागणार असताना दुसरीकडे राहुल यांच्या राजीनाम्यामुळे त्या पक्षात नेतृत्वाचा पेच उभा राहिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पक्षाचे नेतृत्व कुणाकडे जाणार याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नेतृत्व गांधी कुटूंबातील व्यक्तीकडेच असावे, असे बहुतांश कॉंग्रेसजनांना वाटते. गांधी कुटूंब म्हणजे कॉंग्रेसचा अविभाज्य घटक आहे. त्या कुटूंबाला आणि पक्षाला एकमेकांपासून अलग केले जाऊ शकत नाही, असे कॉंग्रेसजनांचे म्हणणे आहे. तर, गांधी कुटूंबाच्या सावलीतून बाहेर पडण्याची संधी कॉंग्रेसला मिळाली आहे. त्यातून पक्षाला नवे स्वरूप मिळू शकते, असे काही राजकीय विश्‍लेषकांना वाटते.

धुरा दुसऱ्या नेत्याकडे सोपवून आणि पक्षात सक्रिय राहून राहुल भविष्यात आणखी लोकप्रिय बनू शकतात, अशी मांडणीही काही विश्‍लेषक करत आहेत. आता राहुल यांच्या निर्णयानंतर सगळ्यांचेच लक्ष कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीकडे लागले आहे. ती बैठक लवकरच होण्याची शक्‍यता आहे. त्या बैठकीत नव्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. तसेच, पक्षाची पुढील रणनीतीही निश्‍चित केली जाईल, असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)