वाई पोलीस ठाण्यात अनागोंदी कारभार

तक्रारदारांना मिळतेयं आरोपीची वागणूक
पोलिसांच्या दबंगगिरीतून सुटकेची मागणी

मेणवली  – फिर्यादी तक्रारदारास चांगली व योग्य वागणूक देण्यात यावी या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वाई पोलीस ठाण्याला विसर पडल्याने सदर आदेशाला केराची टोपलीत टाकून वाई पोलीस ठाणे तक्रार देण्याकरता आलेल्या फिर्यादीला अक्षरश: आरोपीची वागणूक देवून ठाण्याच्या बाहेर पिटाळून लावत आहेत. त्याचबरोबर उध्दट वागणूक देत असल्याचे चित्र वाई पोलीस ठाण्यात नागरिकांना बघावे लागत असल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांनी वाईतील ठाण्याला न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाई शहरासह तालुक्‍याचा निम्मा ग्रामीण भाग वाई पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे छोट्यामोठ्या घडामोडींसह काही वादाचे प्रसंगाच्या तक्रारी वाई पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. त्यांचा कायदेशीर मार्गाने योग निपटारा करणे गरजेचे असताना वाई पोलिसांच्या हेकेखोर उध्दट वागणुकीमुळे तक्रारी मिटण्याऐवजी वाढू लागल्या आहेत. संबंधीत ठाणे अंमलदार फिर्यादीचे म्हणने ऐकून न घेता खून झाल्यावर बघू, पाय तोडल्यावर बघू असे सांगून तक्रार घेताना उडवाउडवी करत असल्याची अनुभूती वाईकरांना मिळत आहे.

वाई पोलिसांच्या या कार्यपद्धतीची जनतेतूनही खुमासदार चर्चा रंगली असून त्यांच्या कारनाम्यांनी वाई पोलीस ठाणेच हतबल झाल्याचे बोलले जात आहे, जनरक्षणाय खलनिग्रणाय या पोलिसांच्या ब्रीद वाक्‍याचा पोलिसांना विसर पडल्यानेच चोर सोडून संन्याशाला फासावर चढवले जात असल्याने आलेल्या तक्रारी मिटण्याऐवजी वाढताना दिसत असूनही सहनही होत नाही व सांगताही येत नाही अशी गत वाई पोलीस ठाण्याची झालेली पहावयास मिळत आहे.

एकीकडे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख जनहिताचे धाडसी निर्णय घेत असताना वाई ठाणे मात्र कर्तव्यात कसूर करून त्यास गालबोट लावण्याचे काम करत असल्याने वाईकर जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. साहजिकच गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना चाप लागण्याऐवजी मोकळीक मिळून सर्वसामान्य जनतेच्या गळ्याचा फास आवळला जात आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

फिर्यादीलाच आरोपीची वागणूक दिली गेल्याने अनेकजन मुकाटपणे अन्याय सहन करत विना तक्रार घरचा रस्ता धरत आहेत. याचे कसलेही सोयरसुतक संबंधीत वाई ठाण्याला नसल्याने वाईकर जनता नाहक भरडली जात असल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांनी वाई ठाण्याला योग्य तो अंमल देवून पोलिसांच्या दंबंगगिरीतून जनतेची सुटका करावी अशी भावना व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)