#कव्हरस्टोरी – वैधतेपेक्षा सुरक्षा महत्वाची (भाग 2)

– अॅड. पवन दुग्गल,नवी दिल्ली

आधारच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शिक्‍कामोर्तब केले, याचा अर्थ आधारशी संबंधित सर्व माहिती सुरक्षित आहे किंवा सुरक्षित झाली, असा घेता कामा नये. आधारच्या माहितीवर हॅकर्सनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आपल्याकडे प्रभावी सायबर सुरक्षितता कायदा अद्याप अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे वैधतेपेक्षा नागरिकांचा विश्‍वास महत्त्वाचा मानून आधारची माहिती सुरक्षित करण्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. हा क्षण सरकारच्या दृष्टीने आनंदाचा नसून, जबाबदारीचा आहे.

न्या. चंद्रचूड यांनी उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌यांकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर आगामी काळात अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीचा मुकाबला करावा लागू शकतो. अर्थात, हा निकाल म्हणजे एक टप्पा आहे. यापुढे आणखी बरेच काही घडणे अपेक्षित आहे आणि यापुढे आधारच्या संदर्भात लिहिले जाणारे सर्व अध्याय सुरक्षिततेशी संबंधित असणार, हेही उघड आहे.

यासंदर्भात भारताला अजून बरेच धडे शिकायचे आहेत. आधारची वाटचाल 2006 पासूनच सुरू होती आणि आता बारा वर्षांत ती इतकी दूरवर पोहोचली आहे की, पाऊल मागे घेणे शक्‍य राहिलेले नाही. न्यायालयानेही आपल्या निकालातून हेच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता आधारमधील डाटा अधिक सुरक्षित आणि आधारची यंत्रणा अधिक सुदृढ करणे ही आता सत्ताधाऱ्यांची जबाबदारी ठरते. आधारच्या माहितीवर सरकारी आणि बिगरसरकारी घटक (स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्‍टर्स) वेगवेगळ्या प्रकारे हल्ले यापूर्वीही करीत होते. सरकारकडून कितीही इन्कार करण्यात येत असला, तरी हॅकर्सनी आधारचा डाटा कशा प्रकारे चोरला, हे उघड गुपित आहे.

दूरसंचार नियमन प्राधिकरणाच्या (ट्राय) अध्यक्षांनी नुकताच आपला आधार क्रमांक सार्वजनिक केला होता आणि माहिती हॅक करण्याचे खुले आव्हान दिले होते. आधारच्या सुरक्षिततेत कुठेही त्रुटी नाहीत, हे सिद्ध करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. परंतु हॅकर्स त्यांच्या आधार क्रमांकाच्या साह्याने ज्या प्रकारे त्यांच्या बॅंक खात्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे सरकारचा दावा पोकळ ठरला. ही माहिती हॅकर्सनी आधार क्रमांकावरून चोरलेली नाही, असे सरकारने कितीही म्हटले तरी नागरिकांना ते पटायला नको का? नैतिक चाच्यांनी (मॉरल हॅकर्सनी) ट्रायच्या अध्यक्षांच्या बॅंक खात्यात एक रुपया जमा केला आणि दाखवून दिले की, हॅकर्सनी मनात आणले, तर ते खात्यातून पैसे काढूही शकतात. आधारला वैधता आता मिळाली असली, तरी आधारच्या सुरक्षिततेविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्‍वासाचे वातावरण आजमितीस तरी नाही. सरकारला ते निर्माण करावे लागेल.

आधारमधील माहिती सुरक्षित बनविण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जाण्याची गरज आहे. वस्तुतः सायबर सुरक्षितता विचारात घेऊन आधारची रचना केली गेलेलीच नाही. त्यामुळे सायबर सुरक्षिततेच्या बाबतीत कुठे-कुठे त्रुटी आहेत, हे सर्वप्रथम पाहायला हवे. नंतर त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. मुख्य बाब अशी की, आधारचा डाटा ज्या-ज्या यंत्रणा आणि व्यक्तींच्या ताब्यात असतो, त्या सर्वांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या पाहिजेत. आधारच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे हाही एक उपाय आहे. त्यानंतर बायोमेट्रिक्‍स डाटा ट्रान्समिशनच्या व्यवस्थापनाशी निगडित संपूर्ण संरचना सुरक्षित करण्यासाठी खास उपाययोजना कराव्या लागतील.

वैधतेपेक्षा सुरक्षा महत्वाची (भाग 1)    वैधतेपेक्षा सुरक्षा महत्वाची (भाग 3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)