कृपा करून शरद पवारांना भाजपा मध्ये घेऊ नका – उद्धव ठाकरे

कोल्हापूर – कोल्हापूर मधील युतीच्या पहिल्याच प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर तुफान फटकेबाजी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समोर शिल्लक कोण राहिलं आहे हेच आता कळत नाही, त्यामुळे कृपा करून शरद पवारांना भाजपा मध्ये घेऊ नका, असा सुप्त टोमणा मारला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक जणांना भारतीय जनता पक्षाने आपल्यात सामील केल्याने उद्धव ठाकरे यांनी भाजपाला देखील चिमटे काढले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करताना उद्धव ठाकरेंनी, “एक खेळाडू देशाचा पंतप्रधान झाला आणि आमच्याकडे पंतप्रधान पदाचे स्वप्न बघणारे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले” असे म्हंटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला मत देणार असाल तर अजित पवार धरणं कशी भरणार होते ते आठवा, असे म्हणत अजित पवार यांच्या जुन्या वाक्याची आठवण देखील त्यांनी करून दिली. अयोध्येतील राम मंदिराचा विषय काढत उद्धव ठाकरेंनी आपलं सरकार पुन्हा आल्यानंतर लवकरात लवकर राम मंदिर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही अशी पूर्ण खात्री असल्याचे वक्तव्य केले आहे.

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मला पळवा पळवी करायची नसून साताऱ्यासाठी नरेंद्र पाटील यांना आणले असल्याने माथाडी कामगारांचा नेता मला खासदार बनवून दिल्ली मध्ये पाठवायचा आहे आणि आपल्या हॄदयातला भगवा विधानसभा आणि लोकसभेवर सुद्धा फडकला पाहिजे अशी भावनिक हाक यावेळी कोल्हापूर मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)