उद्धव ठाकरे, नितीश, पासवान आज मोदींसाठी वाराणसीत

वाराणसी – उत्तरप्रदेशच्या वाराणसीतून पुन्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे भाजपच्या मित्रपक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहून विविध पक्षांचे नेते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या ऐक्‍याचे दर्शन घडवणार आहेत. तामीळनाडूत सत्तेवर असणाऱ्या अण्णाद्रमुकचे नेतेही त्यावेळी उपस्थित असतील. याआधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उद्धव आणि एनडीएच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते. शहा गुजरातच्या गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, मोदी गुरूवारी वाराणसीत दाखल झाले. त्यानंतर सुमारे सात किलोमीटर चाललेल्या रोड शोच्या माध्यमातून त्यांनी शक्तिप्रदर्शन घडवले. त्यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मागील वेळी मोदींनी वाराणसीबरोबरच गुजरातमधूनही लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी ते एकाच मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)