पहिल्या दीड तासात उदयनराजेंची आघाडी

राजे समर्थकांना विजयाची चाहूल : मतदान केंद्राबाहेर जल्लोषाची तयारी
सातारा – विरोधकांना भीती आणि उदयनराजेंचे लीड किती? या टॅग लाईनने सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रचंड गाजली. उदयनराजेंसाठी अगदीच एकतर्फी वाटणारी निवडणूक माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रचंड चुरशीची झाली. तरी साताऱ्यात बच्चनच चालतो हा बोलीभाषेतला परवलीचा ट्रेंड पुन्हा एकदा सिध्द झाला. प्राथमिक मतमोजणीत काहीश्‍या पिछाडीवर असणाऱ्या उदयनराजेंनी नंतरच्या चार फेऱ्यांमध्ये साडेनऊ हजार मतांची आघाडी घेत जोरदार मुसंडी मारली आणि राजेंचे लीड किती याचे उत्तर विरोधकांना द्यायला सुरूवात केली. वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये दिवसभर घडाळ्याची टिक टिक आणि मिशांचा पिळ या दोहोंनीही आपला राजकीय बाज दाखवला.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले हे प्राथमिक मतमोजणीमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर त्यांनी मतमोजणी सुरू झाल्यानंतर दीड तासांनी 9 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. उदयनराजेंविरोधात साताऱ्यामधून भाजपा-सेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे सहदेव एवळे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पहिल्या दीड तासांमध्ये उदयनराजेंना 27 हजार 876 मते मिळाली असून नरेंद्र पाटील यांना 18 हजार 248 मते मिळाली आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन वीर, माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, प्रतापराव भोसले, हिंदुराव निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील, श्रीनिवास पाटील यांच्यानंतर उदयनराजे भोसलेंकडे या मतदारसंघाची सूत्रे आली. मतदारसंघात मराठा, माळी आणि धनगर या तीन समाजाचे प्राबल्य आहे. दहा वर्षांपूर्वी बुधाजीराव मुळीक यांना सोबत घेऊन उदयनराजे यांनी खंडाळा ते कोयनानगर मतदारसंघात पायी भूमाता दिंडी काढली होती. या वेळी या मतदारसंघातील प्रश्‍नांवर त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. मात्र, आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पर्यायाने उदयनराजे यांच्याकडे गेली दहा वर्षे हा मतदारसंघ आणि विधानसभेतील बहुसंख्य मतदारसंघही याच पक्षाकडे असतानाही हे प्रश्‍न आजही तसेच आहेत.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा बालेकिल्ला ठरलेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने याच पक्षाकडे आहेत. पक्षाच्या या शक्तीमुळे उदयनराजे हे मागील दोन्ही निवडणुकांमध्ये मोठया मताधिक्‍याने निवडून आले. त्यांच्या निवडीमागे ते सांगत असलेले राजेपण जेवढे महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा पक्षाची या जिल्ह्यातील ताकद आणि शरद पवार यांनी त्यांच्यामागे लावलेली शक्तीही निर्णायक आहे.

मात्र मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. जिल्ह्यात भाजपाचे वारूही सुसाट सुटले आहे. तर उदयनराजे यांनी स्वपक्षाबरोबरच अनेकांची नाराजीही ओढवून घेतली आहे. आज सातारा शहर व तालुक्‍यापासून ते जिल्ह्यात सर्वत्र त्यांना विरोध करणारी नवी शक्तिस्थाने उभी राहिली आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबरचे उदयनराजे यांचे वाद गेल्या काही दिवसात अगदी रस्त्यावरील हातघाईपर्यंत आलेले आहेत. लोणंद येथील खंडणी प्रकरणात त्यांना झालेली अटक, आनेवाडी टोलनाका ठेका प्रकरणावरून साताऱ्यात झालेला गदारोळ, फलटण येथे जमावाने जात रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरात घुसण्याची केलेली भाषा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच आमदार आणि प्रसंगी नेतृत्वाविरोधात वेळोवेळी केलेली वक्तव्ये या साऱ्यांमुळे उदयनराजे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात उभी दरी पडल्याचे चित्र दिसत आहे. मागील तीन वर्षे सातारा जिल्ह्याने हा टोकाचा संघर्ष पाहिला आहे. पक्षांतर्गत असलेला हा विरोध उदयनराजे यांच्यासाठी सध्या सर्वात नकारात्मक गोष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)