सोनगावच्या फार्म हाऊसवर उदयनराजेंचा मॉर्निंग वॉक

राजेंच्या बदलत्या देहबोलीवर सातारकर फिदा

सातारा – खा. उदयनराजे भोसले यांची प्रत्येक कृती आणि विधान हा बातमीचा विषय असतो. खासदारकीची हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या उदयनराजेंचा विजयानंतरचा राजकीय आणि व्यक्‍तिगत जीवनातील वावर प्रचंड लक्षवेधी ठरू लागला आहे. लोकसभेच्या निकालनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या आभार दौऱ्यावर जाणाऱ्या उदयनराजेंनी शारीरिक तंदरुस्तीवर भर द्यायला सुरुवात केली आहे. सोनगावच्या फार्महाऊसवर उदयनराजेंचा भल्या पहाटेचा मॉर्निंग वॉक सातारकरांना सुखावून जात आहे. राजकीय जागरूकता आणि बॉडी फिटनेसचा राजेंचा हा फंडा सध्यातरी चर्चेचा विषय आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिकण्याची हॅट्ट्रिक करूनसुद्धा त्यांनी अंगावर गुलाल घेणे टाळले आहे. दुष्काळी भागातील शेतकरी व ग्रामस्थांची पाण्यासाठी धडपड पाहून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू झाली होती. कोणी मदत केली? कोणी गद्दारी केली? याच्या खोलात खासदार पडले नाहीत. हे या कृतीतून दिसून आले आहे.

सतराव्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसून भाजपचे सरकार केंद्रात आले आहे. संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होत आहे. अशा वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे साताऱ्यातील खासदार म्हणून श्री. छ. उदयनराजे भोसले यांची जबाबदारी वाढली आहे. याची त्यांना त्यांचे खरे हितचिंतक यांनी जाणीव करून दिली. त्यानंतर उदयनराजे यांनी ट्रॅक पॅन्ट व टी शर्ट परिधान करून सकाळी मॉर्निंग वॉकला सुरुवात केली आहे.

याचा सुखद धक्का त्याच्या चाहत्यांना बसला आहे. गेली आठ वर्षे उदयनराजे साताऱ्यात झालेल्या हिल मॅरेथॉन तसेच इतर धावणी स्पर्धांना हिरवा झेंडा दाखवित होते. परंतु ते कधीही या स्पर्धांमध्ये प्रत्यक्षात सहभागी झाले नव्हते. भरधाव वेगाने गाडी चालविणे, गाणी मोट्या आवाजात ऐकणे असे रूप सातरकरांनी अनेकदा पाहिले आहे. पण, राजे, चक्क मॉर्निंग वॉकला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सातारचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार व उदयनराजे यांचे चुलत भाऊ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे व्यायाम करण्याबाबत आघाडीवर राहिले आहेत. धावणे, चालणे तसेच सायकलिंगच्या माध्यमातून साताऱ्यात त्यांचा मोठा मित्र परिवार बनला आहे. आमदार जयकुमार गोरे, आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, राजकीय विविध पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्‍टर, व्यापारी व हौशी खेळाडू गेल्या काही दिवसांपासून नियमित व्यायाम करत असतात.

काहींनी स्वतःच्या बंगल्यात खास जिमची व्यवस्था केली आहे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे यांनी कधीही जिम बीमची भानगड केली नाही. नैसर्गिकरित्या त्यांना राजबिंडे रूप लाभले असले तरी आता त्यांना शरीराची काळजी घेणे आवश्‍यक ठरू लागले आहे. आतापर्यंत सकाळी चालताना, पळताना, व्यायाम करताना खासादर कोणालाही दिसले नाहीत. मात्र, लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य कमी झाल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागातील वाड्यावस्तीला भेट देणे गरजेचे होते पण, त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना जाता आले नाही. आता निवडणूक निकालानंतर त्यांनी शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे.

दररोज सकाळी लवकर उठून ते सातारा व पुणे येथे वेळ मिळाल्यानंतर सहा ते आठ किलोमीटर अंतर मॉर्निंग वॉक करीत आहेत. आपले राजकीय वजन वाढल्याची व जबाबदारी आल्याची जाणीव झाली आहे. शारीरिक वजन मात्र कमी करण्याचा निर्णय उदयनराजेंनी घेतल्यामुळे त्यांचे कुटुंबीय व जवळच्या मित्र परिवारांना आनंद झाला आहे. खा. श्री. छ. उदयनराजे यांची स्टाईल महाराष्ट्रात लोकप्रिय बनली आहे. त्यांचे अनेक “फॉलोअर आहेत. आता मॉर्निंग वॉकसाठी किती त्यांचे चाहते सकाळी लवकर उठून वॉकला जातात? हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)