राजकीय गोटात चर्चेला उधाण
जिल्ह्याची सूत्रे सोपविण्याबाबत उत्सुकता राजे जाणार रायगडावर
रायगडावर रविवारी होणाऱ्या शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यास खासदार उदयनराजे भोसले जाणार, आहेत असे छायाचित्रदेखील ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. परिणामी यंदाच्या वर्षी सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक मावळे रायगडावर पोहचण्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.
सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार उदयनराजे भोसले यांची बारामतीतील गोविंद बागेत भेट झाली असून त्यांच्यात काय खलबते झाली याबाबत राजकीय गोटात चर्चेला उधाण आले आहे. पवार व उदयनराजे यांच्यातील वाढती जवळीक लक्षात घेता जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सूत्रे उदयनराजेंकडे यांच्याकडे सोपविली जाणार का, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीपासून खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कायम एकत्र येताना दिसून येत आहेत. कराडच्या सभेत पवारांनी उदयनराजेंची कॉलर उंचावली तर निकालानंतर दोघांनी एकत्रित दुष्काळ दौरा केला आणि आता शनिवारी थेट बारामतीच्या गोविंद बागेत खलबते झाल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विशेष बाब म्हणजे, छायाचित्रात तिसरी कोणीही व्यक्ती त्याठिकाणी उपस्थित नसल्यामुळे विशेषत: राष्ट्रवादीत आणि जिल्हावासियांमध्ये राजकीय चर्चांना उधाण येण्यास सुरूवात झाली आहे. उदयनराजेंनी शनिवारी बारामतीच्या गोविंदबागेत पवारांची भेट घेतली.
भेटीनंतर काहीवेळातच छायाचित्र उदयनराजे यांच्या व्टिट्र अकाऊंटवरून प्रसिध्द करण्यात आले. भेटीदरम्यान नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे नमूद करण्यात आले नाही. यापूर्वी उदयनराजे बारामतीच्या गोविंद बागेत गेल्याची माहिती समोर आलेली नव्हती. लोकसभा निवडणुकीपासून उदयनराजे आणि पवार हे कायम एकत्र येताना दिसून येत आहेत. कराडच्या सभेत पवारांनी उदयनराजेंची कॉलर उंचावल्यापासूनच जिल्ह्यात राजकीय चर्चांचा जोर वाढला होता. त्यानंतर पवारांसोबत दुष्काळी दौरा आणि आता तर थेट बारामतीच्या गोविंदबागेत खलबते झाल्यामुळे विशेषत: राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही.
कारण, तीन दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत उदयनराजे प्रथमच पक्षाच्या व्यासपीठावर विराजमान झाल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर, उदयनराजे आणि रामराजे नाईक निंबाळकर व्यासपीठावर शेजारी बसले होते. माढा लोकसभा मतदारसंघ खेचून आणण्यात रामराजेंना यश मिळाले नाही तर साताऱ्याचा गड राखण्यात उदयनराजेंना यश मिळाले. एकूणच सर्व घटनाक्रम आणि पवार व उदयनराजेंची वाढती जवळीक पाहता सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे उदयनराजे यांच्याकडे सोपविण्याच्या चर्चांना उधाण येण्यास सुरूवात झाली आहे.