उदयनराजे लागले तयारीला

समर्थकांची आज सातारा येथे बैठक

सातारा – राष्ट्रवादीकडून लोकसभेचे तिकिट निश्‍चित झाल्यानंतर उत्साह दुणावलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांची होमग्राउंड असणाऱ्या सातारा शहरासह तालुक्‍यात राजकीय मशागत सुरू झाली आहे. या तयारीचा भाग म्हणून उदयनराजे समर्थकांची येत्या 14 मार्च रोजी कल्याण रिसॉर्ट येथे दुपारी 1 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आमदार गट सहभागी होणार की नाही हा खरा औत्सुक्‍याचा विषय आहे. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी पुण्यात बारामती होस्टेलवर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन घडवण्यासाठी राजकीय शिष्टाई केली व सर्वांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

पक्षाकडून अद्याप अधिकृतपणे प्रचाराचा नारळ फुटला नसला तरी उदयनराजे मित्र समूह मात्र झटून कामाला लागला आहे. रजताद्री हॉटेल येथील उदयनराजे यांचे संपर्क कार्यालय अद्ययावत करण्यात आले आहे. उदयनराजे भोसले मित्र समूहाकडून सातारा शहर व तालुक्‍यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, व सातारा विकास आघाडीच्या सर्व सदस्यांना तातडीच्या बैठकीचे निरोप पोहचले आहेत. ही बैठक दि. 14 मार्च रोजी दुपारी 1 वाजता येथील कल्याण रिसॉर्टमध्ये बोलवण्यात आली आहे. याच रिसॉर्टमध्ये आठवड्यापूर्वी उदयनराजे समर्थकांनी बैठक घेतली होती, तेंव्हा समर्थकांनी राजेंना भाजपा प्रवेशाची हाक दिली होती.

मात्र थेट पवारांच्या मध्यस्थीमुळे आता साताऱ्यात चित्र बदलले आहे. मात्र राष्ट्रवादीचे निष्ठावंत अजूनही पक्ष उमेदवारासाठी म्हणजे उदयनराजे यांच्या प्रचारासाठी कामाला लागलेले नाहीत. सहा विधानसभा मतदारसंघातील विकासाचे प्रलंबित प्रश्न, आमदारांची नाराजी आणि उदयनराजे यांच्या तंबूत असणारी सच्च्या कार्यकर्त्यांची असणारी उणीव ही प्रचंड मोठी अडचण आहे. अशाही परिस्थितीत सर्व विषय बाजूला ठेवून उदयनराजे भोसले कामाला लागले आहेत.

जख्मं अभी गहरा है बाबू पवारांनी मध्यस्थी केली आणि साताऱ्यात मनोमिलनाची बासरी वाजली असे रम्यं स्वप्न पाहणे हा राजकीय वेडगळपणा आहे. आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याची भूमिका मांडली तरी सुरूची राडा प्रकरणाची आंतरिक खदखद संपलेली नाही. त्यात सातारा पालिकेच्या निवडणूकीत आमदारांच्या पत्नीचा झालेला पराभव ही अत्यंत दुखरी सलं आहे. नगर विकास आघाडीला खासदार गटाकडून मिळालेली दुय्यम वागणूक या सगळ्या गोष्टींमुळे आमदारांची राजकीय तयारी झाली तरी आमदार निष्ठावंत मात्र अद्याप विमनस्क आहेत. त्यामुळेच जख्म अभी गहरा है बाबू हीच त्यांची खरी अडचण आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)