उदयनराजेंच्या आरक्षण विधानाचा “वंचित बहुजन आघाडी’कडून निषेध

सातारा – खासदार उदयनराजेंनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या केलेल्या मागणीचा वंचित बहुजन आघाडीने जाहीर निषेध केला आहे. त्याच बरोबर येत्या लोकसभेला उदयनराजेंच्या विरोधात कष्टकरी बहुजन समाजातील मुलगा उभा करणार असल्याचे आघाडीचे प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत उपस्थित होते.

खासदार उदयनराजे यांनी आपल्या विधानाचा किती लोकांवर परिणाम होतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी अशी विधाने करण्यापेक्षा आपले मत संसदेत मांडायला हवे. अशी मागणी करून माने पुढे म्हणाले, आर्थिक निकषावर आरक्षण ही संकल्पना आकर्षक वाटत असली तरी ती फसवी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या दुष्काळ असल्यामुळे उत्पन्नात घट होणार असली तरी पुढील वर्षी पाऊस पडला की उत्पन्न वाढणार आहे, या पार्श्वभूमीवर आर्थिक निकष हा कधीच कायम रहात नाही. मात्र मनुष्याची जात ही कायम रहात असते व त्याच निकषावर घटनेने आरक्षण दिलेले आहे. मात्र, तरी ही आर्थिक निकषावर आरक्षणच द्यायचे असेल तर प्रथम देशातील सर्व मंदिरांवर असलेला ताबा काढून घ्या, मोजक्‍या उद्योजकांनी कमावलेला नफा सरकारी तिजोरीत जमा करा, त्याच बरोबर संपत्तीमध्ये सर्वाना समान वाटा द्या अशी मागणी माने यांनी केली.

त्यांच्या सारखे वागला तर सोबत या

छत्रपती शिवरायांबद्दल जनतेच्या मनात श्रद्धा आहे व त्यामुळे खासदार उदयनराजे यांचे राजेपण हे केवळ जनतेच्या प्रेमावर टिकून आहे. जनतेच्या भल्याचे त्यांनी पाहणे आवश्‍यक आहे.आपल्या विधानाने गरीब माणसांना काय वाटेल याचा विचार त्यांनी केला पाहिजे.मात्र राजाच जर रयतेला सोडून जात असेल तर आता त्यांच्या विरोधात शेतकऱ्याचा पोरगा उभा करणार आहे. ते जर छत्रपती शिवराय व संभाजीराजे यांच्याप्रमाणे वागणार असतील तर त्यांनी आमच्या सोबत यावे, असे आवाहन माने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)