उत्कर्ष क्रीडा संस्था व राजमाता जिजाऊ संघांना विजेतेपद

पुणे: भोसरी श्री शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरूष विभागात उत्कर्ष क्रीडा संस्था व महिला विभागात राजमाता जिजाऊ हे संघ आमदार चषकाचे मानकरी ठरले. कै. प्रमोद कुलकर्णी क्रीडानगरीत आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ कबड्डी संघ आयोजित करण्यात आलेल्या “आमदार चषक ‘ मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

पुरूष विभागात झालेल्या अंतिम सामन्यात उत्कर्ष क्रीडा संस्था संघाने महाराष्ट्र कबड्डी संघावर 37-15 असा विजय दणदणीत विजय मिळवित आमदार चषक पटकाविला. मध्यंतरालाच उत्कर्ष क्रीडा संस्थेकडे 26-11 अशी भक्कम आघाडी होती. सामन्याच्या सुरवातीलाच दोन्ही संघानी आक्रमक खेळ करण्यास सुरवात केली खरी मात्र पहिल्याचा दहा मिनिटामध्ये महाराष्ट्र कबड्डी संघावर लोन लागल्याने त्यांचा बचाव खिळखिळा झाला. हा बचाव भेदण्याचे काम उत्कर्ष क्रीडा संघाच्या गणेश कांबळे याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर केले. तर त्याला शुभम गायकवाड याच्या चढाया व चेतन पारधे याने घेतलेल्या उत्कृष्ठ पकडींमळे महाराष्ट्र संघाचे मनोधैर्य खच्ची करण्यात मोलाचा वाटा उचलला. मध्यंतराला काही मिनिटे बाकी असतानाच उत्कर्ष संघाने आणखी एक लोन लावला. त्यामुळे मध्यंतराला उत्कर्ष संघाने चांगली आघाडी मिळविली. या स्पर्धेत सर्व आपल्या सर्व सामन्यात उत्कृष्ट चढाया करणारे महाराष्ट्र संघाच्या दिपक गिरी व चेतन थोरवे यांना या महत्त्वाच्या सामन्यात सुरवातीलाच उत्कर्षच्या चेतन पारधेने घेतलेल्या पकडींमुळे खच्ची झाल्याने काहीही प्रभाव पाडू शकले नाही तर त्यांचा बचाब पट्टू अक्षय नखातेलाही काही मह्त्वाच्या वेळी पकडी घेण्यात अपयश आले. याचाच फायदा उत्कर्ष संघाने घेत मध्यंतरानंतर आपला खेल संथ केला मात्र याडावातही एक लोन लावण्यात ते यशस्वी झाले. या उलट महाराष्ट्र संघाच्या पाठिशी प्रेक्षक असूनही या खेळाडूंनी आपले आक्रमण वाढविण्या ऐवजी सामन्याची वेळ खेळून काढण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसून आले. यामुळे मध्यंतरानंतर हा सामना अत्यंत रटाळ झाल्याने प्रेक्षकही नाराज झाले परिणामी त्यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

महिला विभागात राजमाता जिजाऊ संघाने जागृती प्रतिष्ठन संघावर 45-8 असा धुव्वा उडवित शानदार विजय मिळवित आमदार चषक पटकाविला. मध्यंतरालाच राजमाता जिजाऊ संघाकडे 26-3 अशी निर्णायक आघाडी होती. सामन्याच्या पहिल्याच मिनिटापासून राजमाता जिजाऊ संघातील स्टार खेळाडू स्नेहल शिंदे, सायली केरीपाळे, अंकिता जगताप व मानसी सावंत यांनी आपल्या नावलौकिकाला साजेसा सर्वच आघाड्यांवर उत्कृष्ठ खेळ केला. यामुळे सामन्याच्या पहिल्या सात मिनिटातच जागृती प्रतिष्ठानवर पहिला लोन लावत जागृती प्रतिष्ठानची दाणादाण उडवित त्यानंतर काही वेळातच त्यांनी आणकी एक लोन लावत राजमाता जिजाऊच्या स्नेहल साळुंके व सायली केरीपाळे यांनी आपले इरादे स्पष्ट केले. जागृती प्रतिष्ठानच्या खेळाडूंना राजमाता जिजाऊच्या स्नेहल साळुंके व सायली केरीपालेचे आक्रमण परतवून लावण्यात आणि अंकिता जगताप व मानसी सावंत यांचा बचाव भेदने शक्‍य झाले नाही.

मध्यंतरापुर्वी विजयाची खात्री झाल्यानंतर मध्यंतरानंतर अनुभवी प्रशिक्षक राजेश ढमढेरे यांनी मानसी सावंत हिच्या जागेवर सायली रोडगेला, पायल घेवारेच्या जागेवर प्रियांका मांगलेकर आणि स्नेहल शिंदेच्या जागेवर मंदिरा कोमकर यांना खेळविले. यांनीही आपली कामगिरी चोख बजावत आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. जागृती प्रतिष्ठानच्या ऋतिका होनमाने हिने उत्कृष्ट चढाया केल्या व अंजली मुळे आणि वर्षा यादव हिने काही पकडी करण्याचा प्रयत्न करीत काहीसा प्रतिकार केला मात्र त्यांना या सामन्यात आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर सपसेल अपयश आल्याने दारून पराभवाला सामोरे जावे लागले.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी स्पर्धा पुणे मनपाचे नगरसेवक बाळासाहेब बोडके, दशरथ लांडगे, पांडूरंग धावडे, दिपक धावडे, रामदास लांडगे, संभादी फुगे, दत्ता माने, सचिन गव्हाणे, बंटी धावडे, नारायण गव्हाणे, पंडीत गव्हाणे, तुकाराम गवळी, पांडूरंग गवळी, संतोष लोंढे, रणजीत गव्हाणे, योगेश लांडगे, ई प्रभाग अध्यक्षा नगरसेविका भिमाताई फुगे, शिक्षण मंडळाच्या सदस्या नगरसेविका सोनाली गव्हाणे, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह मोहन भावसार, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह मधुकर नलावडे, स्पर्धा मुख्य आयोजक राष्ट्रीय खेळाडू सुनिल लांडगे व उद्योजक अमोल फुगे, स्पर्धा निरिक्षक राजेंद्र आंदेकर व पंच प्रमुख संदीप पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)