लातूरमधून रेल्वे कोच येण्यास आणखी दोन वर्षे

भूसंपादन पूर्ण : कामगार मंत्री, रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती

पुणे – महानगरे, शहरांमधील उपनगरीय लोकल रेल्वेचे डबे आणि मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या डब्यांची निर्मिती करणारा कारखाना (कोच फॅक्‍टरी) लातूर येथे उभारण्यात येत आहे. यासाठी भूसंपादनाचे सर्व काम झाले असून फॅक्‍टरी उभारण्याचे कामही सुरू आहे. येत्या दीड-दोन वर्षांत फॅक्‍टरीचे पूर्ण काम होऊन प्रत्यक्ष कोचची निर्मिती सुरू होईल, अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महामेट्रो आणि रेल्वेच्यावतीने देशभरातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निलंगेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी रेल्वे बोर्डाचे अधिकारी राजेश अगरवाल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ऍग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर आदी उपस्थित होते.

निलंगेकर म्हणाले, “महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मेट्रोची लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मेट्रोचे मार्ग तयार होत आहेत. परंतु, सध्या या मार्गावरुन धावणाऱ्या मेट्रो रेल्वेला विदेशात तयार होणाऱ्या डब्यांचा वापर करावा लागतो. विदेशातील रेल्वे डब्याऐवजी महाराष्ट्रातच मेट्रोचे डब्बे तयार केले, तर येथील तरुणांना रोजगार मिळण्याबरोबरच विकासाला गती मिळेल. येत्या दोन वर्षांत लातूरमधील कोच फॅक्‍टरीमधून प्रत्यक्ष कोच निर्मिती सुरू होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

रेल्वे प्रशासनाकडून 500 कोटींची गुंतवणूक
राज्यात लातूरमध्ये रेल्वे, मेट्रोचे कोच बनवणारा पहिलाचा कारखाना उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम टप्प्याटप्याने होणार आहे. सुरवातीला पहिल्या टप्यातील कामसाठी रेल्वे प्रशासनाकडून 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अधिकारी राजेश अगरवाल यांनी दिली. उत्तरप्रदेशातील रायबरेली याठिकाणी अशा प्रकारची फॅक्‍टरी असून यामुळे तेथील विकासाला चालना मिळाली आहे. यामुळे लातूर आणि परिसरातील शहरांचा विकास या फॅक्‍टरीमुळे होईल, असा विश्‍वास अगरवाल यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)