नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने शुक्रवारी आणखी दोन भाषणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली. महाराष्ट्राच्या नांदेडमधील सभेत मोदींनी कॉंग्रेसचा उल्लेख बुडते टायटॅनिक जहाज अशा शब्दांत केला होता. तर, उत्तरप्रदेशच्या वाराणसीत त्यांनी सशस्त्र दलांचा उल्लेख केला होता. मात्र, त्या भाषणांमधून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला. आयोगाने आतापर्यंत मोदी यांच्याविरोधातील आचारसंहिता भंगाच्या पाच तक्रारींवर निर्णय दिला आहे. त्या सर्व प्रकरणांत मोदींना क्लीन चिट देण्यात आली. याआधी महाराष्ट्रातील वर्धा, लातूर आणि राजस्थानमधील बाडमेरमधील सभांमध्ये मोदींनी केलेल्या वक्तव्यांवरून निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांच्या त्या भाषणांची छाननी करून आयोगाने निर्णय दिले.