भाजपच्या वळचणीला गेलेले दोन्ही अपक्ष आमदार पुन्हा आघाडीत सामील
बंगळुरू: अंतर्गत धुसफुसीमुळे अस्थिर बनलेल्या कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस सरकार मध्ये आज दोन नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेली तेरा महिने सत्तेवर असलेल्या सरकारला स्थीरता देण्यासाठी हा अल्प विस्तार करण्यात आला असून आर शंकर आणि एच नागेश या दोन अपक्ष आमदारांना कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांना आज राज्यपालांनी शपथ दिली.
शंकर हे कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात सुरूवातीला मंत्री होते पण गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांना वगळण्यात आले होते. त्यांनी आणि नागेश यांनी आघाडी सरकारच्या विरोधात बंड करून भाजपला पाठिंबा जाहींर केला होता. पण त्यांना आज मंत्रिमंडळात घेण्यात आल्याने हे दोन बंडखोर आमदार आता पुन्हा आघाडीच्या वळचणीला आले आहेत. या दोन आमदारांना हाताशी धरून भाजपने राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अयशस्वी झाल्यानंतर या दोन्ही आमदारांनी पुन्हा आघाडी सरकारशी जुळवून घेतले होते. जेडीएस आणि कॉंग्रेसच्या सरकारने या दोन्ही अपक्ष आमदारांना पुन्हा आपल्याबाजूने वळवण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.